बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळा (गोमेकॉ) बाहेरील हटविण्यात आलेल्या गाड्यांना (दुकाने) पर्यायी जागा उपलब्ध करण्याच्या प्रत्यक्ष कामाला चालू आठवड्यात प्रारंभ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गाडेधारकांच्या शिष्टमंडळाला काल दिले. बांबोळी येथील गाडे हटविण्यात आलेल्या व्यावसायिकांनी स्थानिक आमदार आंतोनिओ फर्नांडिस यांच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची काल भेट घेतली.
दरम्यान, गाडे हटविण्यात आलेल्या गाडेधारक व्यावसायिकांनी साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती इनासियो परेरा यांनी दिली.