तिमिरातून तेजाकडे …

0
56
  • सौ. दीपा जयंत मिरींगकर.

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. या उत्सवाची समाप्ती या मोठ्या दिवाळीने होते. गेल्या वर्षी सगळ्या उत्सवावर कोरोनाचे सावट होते. यावर्षी ते काही प्रमाणात तरी दूर झाले आहे. त्यामुळे आता आपणही सज्ज होऊया … तिमिरातून तेजाकडे जायला!

अंगणात सजलेले रंगवलेले तुळशी वृंदावन, पणत्यांच्या ओळी, वर पेटलेला आकाशदिवा, घरातील महिला काठापदराच्या साड्या नेसून, दागदागिने घालून लगबग करत असतात. शेजारचे, नात्यातील लोक, आप्तस्वकीय लोक लग्नाला जमलेले असतात. तुळशीला नेसवलेली साडी, माळलेली वेणी आणि फुलांच्या मुंडवळ्या. तुळशीत ठेवलेले आवळेचिंचा, उसाची कांडी असा सगळा थाट असतो. सर्वांना अक्षता वाटल्या जातात आणि मग मंगलाष्टकांचा गजर सुरू होतो. तुळस म्हणजे नवरी आणि घरातील शाळिग्राम किंवा बाळकृष्ण हा नवरा यांचा हा विवाह गोव्यात अगदी खराखुरा लग्नसोहळा असतो.
वरुण कृपेने तयार झालेले पीक म्हणजे मुख्यत: भात घरात आलेले असायचे. पाऊस संपून थंडी पडायला सुरुवात होते त्याचवेळी येते ती दिवाळी आणि मोठी दिवाळी. यासाठी नव्या भाताचे पोहे करणे हे एक मोठे काम पूर्वी असायचे. भात उकडायचे, भाजायचे आणि कांडायचे. आता हे काम गिरणीत होते आणि पोहे तर विकतच आणले जातात. पण गोव्यात दिवाळी आणि मोठ्या दिवाळीसाठी पोहे आवश्यक असतात. बाकीचा फराळ मग दुय्यम असतो. लाडू, शंकरपाळी, शेवचिवडा असतो, पण त्याला फार कोणी विचारत नाही. करंजीचा मान तर चतुर्थीला असतो. म्हणून देवाला नैवेद्य दाखवायचा तो वेगवेगळ्या पोह्यांचा.

कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी. आषाढी एकादशीला (देवशयनी एकादशीला) झोपलेले श्रीविष्णू चार महिन्यांनी कार्तिकी एकादशीला झोप संपवून जागे होतात. श्री विष्णू उठले की त्यांचा विवाह त्यांना प्रिय असलेल्या तुळशीशी लावला जातो. म्हणूनच तुळशीला विष्णुप्रिया असेही नाव आहे. या विवाहाची तयारी खूप आधीपासून म्हणजे आषाढात ज्यावेळी चातुर्मास सुरू होतो त्या दिवसापासून- जशी आपल्या घरातील मुलगी लाडाकोडाने वाढवतो, जपतो तसेच तुळशीचे गोजिरवाणे रोप नवीन माती घालून वृंदावनात रोवलं जातं.. त्या क्षणापासून!! पावसाची रिप्‌रिप् फार असल्यामुळे माता-भगिनी त्या रोपाला फुलानंच शिंपडून पाणी घालतात. असं हे रोप दिसामासाने वाढू लागते आणि कार्तिक शु. द्वादशीपर्यंत छान डवरते. तुळस ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती असल्यामुळे शास्त्राने तिचे नाते देवांशी, पितरांशी आणि मानवाशी जोडले आहे. तिला वृंदा, वृंदावनी, विष्णुप्रिया, बारिका, सुमुखा, गंधपनिजनक, पूर्णसा, दिव्या, सरला अशी अनेक नावे आहेत. त्याशिवाय तिला सुरसा, सुलभा, बहुमंजिरी, गौरी, शुलघ्नी, देवदुंदुभी अशी नावे तिच्यातील औषधी गुणधर्मावरून पडलेली आहेत. प्रत्येक हिंदू घरात तुळशी विवाहाची तयारी सकाळीच सुरू होते. अंगण शेणाने सारवून रांगोळी काढतात. तुळशी वृंदावनाला रंगवतात व फुलांच्या माळा लावतात. तुळशीरोपाजवळ उसाचे वाड व दिंड्याची काठी रोवतात. मुळाशी चिंचा-आवळे घालतात. तिला वस्त्र नेसवतात. दुपारी तिचे केळवण असते. गोडाचे जेवण करतात. तिला तेल-हळद लावतात व गरम पाणी- थोडे घालतात. जेवणाच्या पानाचा नैवेद्य दाखवून आरती ओवाळतात. संध्याकाळचाच मुहूर्त या लग्नासाठी योजतात. संध्याकाळी सगळ्या पणत्या पेटवतात. लोक जमतात. शास्त्रानुसार लग्नविधी होतो. नैवेद्याला गोड पोहे, चुरमुरे, उसाचे तुकडे घातलेले पोहे असे प्रकार असतात. मंगलाष्टके, आरत्या झाल्यावर प्रसाद वाटप व शेवटी तिची ओटी भरतात. लग्न झाल्यावर जशी लेकीची ओटी भरून पाठवणी करतात तीच प्रथा इथेही दिसते.

तुळस या नावाची वनस्पती आणि तुलसी हे तिचे संस्कृतीकरण. समुद्रमंथनाच्या वेळी त्यातून जे अमृत निघाले त्याचे काही थेंब जमिनीवर पडले आणि त्याची तुळस झाली. पुढे ब्रह्मदेवाने ती विष्णूला दिली असा उल्लेख स्कंद पुराणात आढळतो. तुळशीचे केवळ दर्शनही पापनाशक असून पूजनतर मोक्षदायी मानले जाते. प्रत्येक हिंदू घरादारात तुळस लावली जाते. तुळशीमुळे वातावरणातील हवा शुद्ध होते. तुळशीपत्रांचा अर्क बर्‍याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो. देवपूजेत तुळशीचे पान असावे लागते. मृत्युसमयी गंगाजलाबरोबर तुळशीपत्र तोंडात ठेवल्याने माणूस वैकुंठात पोचतो अशी श्रद्धा आहे. तुळशीचे झाड प्राणवायू सोडते हे आता सिद्ध झाले आहे. याच गुणधर्मामुळे तुळशीच्या सान्निध्यात राहावे, जास्तीत जास्त संवर्धन करावे, म्हणूनच तुलसीविवाह करण्याची प्रथा पडली असावी, असे सांगितले जाते.

गोव्यात पोर्तुगीज काळातील साडेचारशे वर्षांच्या भल्यामोठ्या जुलमी कालखंडातसुद्धा हिंदूंनी आपल्या रूढी, परंपरा प्राणपणाने जोपासल्या. आपल्या उज्ज्वल संस्कृतीबाबत तडजोड केली नाही. गोव्यातील पेडणेपासून काणकोणपर्यंत व सत्तरीपासून तिसवाडीपर्यंत तुळशीविवाहाची धामधूम असते. एखाद्याचे घर साधे असेल पण चांगले तुळशीवृंदावन बांधल्याशिवाय तो राहत नाही. काही ग्रामीण भागात अजूनही बैठी तुळशीवृंदावने दिसतात त्याचे कारण जमिनीवर पाटावर बसून यथासांग तुळशीची पूजा करता यावी म्हणून! तुळशी वृंदावन हे घरासमोरील दैवत असते.

वृंदा ही राजा जालंदराची सात्त्विक आणि सुशील पत्नी होती. राजा जालंदराने आपल्या ह्या पत्नीच्या पुण्याईने तिन्ही जगाचे स्वामित्व मिळवले होते. परंतु विष्णूने कपटाने वृंदेचे पावित्र्य भंग केले त्यामुळे वृंदेने विष्णूला शाप दिला. म्हणून पुढच्या जन्मी म्हणजेच राम अवतारात श्रीरामाला पत्नी विरह सहन करावा लागला. मात्र त्यापुढील अवतारात ह्या वृंदेने, तुळशीने रुक्मिणीचा तर विष्णूने भगवान श्रीकृष्णाचा जन्म घेतला. ह्या दोघांचा विवाह कार्तिक महिन्याच्या बाराव्या दिवशी झाला. आजही हा विवाह संपूर्ण भारतात उत्साहात साजरा केला जातो. या विवाहसोहळ्याला सगेसोयरे जमतात आणि मुख्य म्हणजे यानंतर ठरलेले सारे विवाहसोहळे सुरू होतात. तुलसीविवाह झाला की उपवर मुले-मुली असलेल्या घरातून लग्न ठरवायची किंवा ठरलेले लग्न पार पाडायची धूमधाम सुरू होते. या दिवसापासून लग्न, मुंज अशा अन्य शुभकार्यांना प्रारंभ केला जातो. तुळशीविवाह करणार्‍याला कन्यादानाचं पुण्य मिळतं असंही मानलं जातं, तर वर्षातील सर्व २४ एकादश्यांचं व्रत करणार्‍यांना मोक्ष मिळतो असंही मानलं जातं.

आमच्या लहानपणी घरातील ज्येष्ठ मंडळी, विशेषत: आजी सांगायची ‘तुळशीचे लग्न झाल्याशिवाय आवळा, चिंच खायची नाही. लग्न उशिरा होईल.’ आंबट चिंबट आवडीच्या, खायच्या वयात कदाचित बंधन घालून संयम शिकवला असेल. शिवाय पूर्ण पक्व झाल्याशिवाय फळ काढू नये असाही हेतू असेल. तुळशीच्या लग्नाच्या वेळी वृंदावनात घातलेल्या चिंचा, आवळे लग्नानंतर वाटून खायचे.

पूर्वी घरातील महिलांना घरातून बाहेर पडणे म्हणजे कठीण होते. एवढेच नाही तर बाहेरच्या ओसरीवर येणे शक्य नव्हते. पण अंगणातील तुळशीमायने घरातील अस्तुरीला एक संधी दिली ती बाहेरचे जग, आणि वरचे आकाश पाहण्याची. त्यामुळेच घरातील स्त्री तुळशीला आपली सखी मानू लागली. म्हणूनच एक फुगडी म्हटली जाते…
‘दारातले तुळशी गे पानन पान फुलशी गे|
पायातल्या जोडव्यासाठी किती लोक वनवासी गे .. किती लोक वनवासी|
हातातल्या चुड्यासाठी किती लोक वनवासी गे .. किती लोक वनवासी|
कपाळाच्या कुंकमासाठी किती लोक वनवासी गे.. किती लोक वनवासी|
गळयातल्या मण्यासाठी किती लोक वनवासी गे .. किती लोक वनवासी|
आपल्या सौभाग्याची, अहेवपणाची ठेव अखंड राहू दे म्हणून तुळशीचा आशीर्वाद ती मागते. तिची पुजा करते.
गोव्यात व्हडली दिवाळी म्हणजे मोठी दिवाळी म्हणजे तुळशीपूजन आणि विवाह. नरकचतुर्दशीच्या आदल्या रात्री नरकासुर बनवून त्याला नाचवून पहाटे कधीतरी त्याला मारून (जाळून) घरी आले की दिवाळीचे अभ्यंग स्नान करायचे आणि फोव खायचे. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे रसातले, कढीतले गूळ पोहे चविष्ट पोहे केवळ दिवाळीतच केले जातात. इतर फराळ असतो पण त्याला तेवढी मागणी नसते.
मोठ्या दिवाळीलासुद्धा दुधातील पोहे असतात. दूध, साखर, वेलची घातलेले गावठी चविष्ट पोहे खाल्ले तर दुसरे कोणतेच पक्वान्न आठवणार नाही.

पणत्यांची रोषणाई, तुळशी वृंदावनाभोवतीची सुरेख रांगोळी, एखाद्या खर्‍या लग्नघरासारखे सजलेले घर यामुळेच ही दिवाळी मोठी दिवाळी मानली जाते. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. या उत्सवाची समाप्ती या मोठ्या दिवाळीने होते. गेल्या वर्षी सगळ्या उत्सवावर कोरोनाचे सावट होते. यावर्षी ते काही प्रमाणात तरी दूर झाले आहे. त्यामुळे आता आपणही सज्ज होऊया … तिमिरातून तेजाकडे जायला!!!!