केदारनाथ यात्रा ः एक अनुभव

0
109
  • यती लाड

माझ्या केदारनाथ यात्रेदरम्यान मी दोन घोडे मृत्युमुखी पडलेले पाहिले. असे दररोज एक किंवा दोन घोडे आपले प्राण सोडत असतात अशी माहिती इथल्या स्थानिकांनी दिली. हे घोडे स्थानिकांच्या उपजीविकेचे साधन जरी असले तरी त्याचे होणारे शोषण सहन करण्यासारखे नाही.

देश-विदेशातील हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या भगवान केदारनाथ धामचे दरवाजे ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता बंद करण्यात आले. बाबा केदारनाथाचा जयघोष करत हे दरवाजे बंद करण्यात आले.

चारधाम यात्रेतील केदारनाथ हे एक महत्त्वपूर्ण मंदिर मानले जाते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ हे एक आहे. हे मंदिर हे केवळ सहा महिन्यांसाठीच भाविकांच्या दर्शनास खुले असते, तर उर्वरित सहा महिने ते बंद ठेवले जाते. या मंदिराचे दर्शन घेतल्यावर सर्व दुःखे दूर होतात व मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. केदारनाथ मंदिर सहा महिने बर्फाने झाकले गेलेले असते आणि येथील खराब हवामानामुळे या मंदिराचे ‘कपाट’ (दरवाजा) सहा महिन्यांसाठी बंद केले जातात. कपाट बंद करण्यापूर्वी मंदिराच्या परिसराची स्वच्छता करून आतमध्ये एक दिवा लावला जातो व मंदिर बंद केले जाते. असे म्हणतात की हा दिवा सहा महिने तेवत असतो.

केदारनाथ मंदिराची अनेक रहस्ये आहेत. हे मंदिर नेमके कधी बांधले गेले याची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही मात्र इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि धार्मिक गटांनी बनवलेले असंख्य सिद्धांत आहेत. १०७६ ते १०९९ या काळात राज्य करणार्‍या राजा भोजने हे पवित्र मंदिर बांधले होते, असे काहींचे म्हणणे आहे, तर दुसरा सिद्धांत असे म्हणतो की महान ऋषी, संत आणि तत्त्वज्ञानी आदी शंकराचार्यांनी हे मंदिर ८ व्या शतकात चारधाम यात्रेची पुनर्स्थापना करण्याच्या प्रयत्नात बांधले. दुसरीकडे एक असाही सिद्धांत आहे की केदारनाथ धाम पांडवांनी द्वापारयुगात तपश्चर्या केल्यानंतर बांधले. वैज्ञानिक संशोधकांनी हे मंदिर इथल्या अत्यंत प्रतिकूल हवामानाचा सामना करू शकते एवढे ह्या मंदिराचे बांधकाम मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे.

असे हे मंदिर केदारनाथ, खारचकुंड आणि भारतकुंड या तीन उंच पर्वतांनी वेढलेले आहे. हे मंदिर ३,५८१ मीटर उंच आहे. शिवाय या मंदिरापर्यंत जाणे सोपे नाही. गौरीकुंड ते मंदिर फक्त चढाव आहे. त्याशिवाय जसजसे आपण मंदिराजवळ पोहोचतो तसतशी याठिकाणी प्राणवायूची पातळी कमी होत जाते. त्यामुळे अनेकांना मंदिरापर्यंत पायी जाणे शक्य होत नाही. मंदिरापर्यंत जाण्यासाठी गौरीकुंडपासून १४ कि.मी.चा ट्रेक करावा लागतो. हे अंतर खरे तर ५ ते ६ तासांत गाठणे शक्य आहे. मात्र माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना हे कठीण जात असल्याने हा ट्रेक ८ ते ९ तासांचा होतो. या कारणामुळे अनेक भाविकांना ही यात्रा शक्य होत नाही आणि म्हणून हेलिकॉप्टर, पालखी आणि घोडे यांसारखे पर्याय तुम्हाला मंदिरापर्यंत जाण्यासाठी उपलब्ध आहेत.

पण इथूनच या यात्रेचे व्यापारीकरण सुरू होते आणि निसर्गाचा समतोल बिघडण्याचीही सुरुवात होते. म्हणूनच की काय, २०१३ मध्ये महादेवाने आपले रौद्ररूप दाखवून आपल्या मंदिरापर्यंत येणारी वाटच उद्ध्वस्त करून टाकली. पूर्वीचा मार्ग २०१३च्या पुरात वाहून गेल्यानंतर मंदिराकडे जाण्यासाठी दुसरा मार्ग तयार करण्यात आला आहे. २०१८पर्यंत हा रस्ता पूर्ववत करण्याचे काम सुरू होते.

२०१३मध्ये उत्तराखंडमधील महाप्रलय हा त्सुनामीनंतरची सर्वांत भीषण नैसर्गिक आपत्ती होती. यात अनेक भाविकांनी आपले प्राण गमावले, तर हजारो नागरिक बेपत्ता झाले, ज्यांचा आजपर्यंत शोध लागू शकला नाही. यात मुलांचादेखील समावेश होता. त्या भयप्रद घटनेनंतर तीन वर्षांनी या भागात मानवी सांगाडे आढळले असल्याचेही वृत्त समोर आले. त्यानंतर उत्तराखंडच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाचा धोका सातत्याने वाढत गेला आहे. या भागात गेल्या सात वर्षांत भूस्खलनाच्या संख्येत १०पटीने वाढ झाली आहे. शास्त्रज्ञांनी वाढत्या भूस्खलनाचे कारण डोंगराळ भागात पावसात झालेले बदल आणि मानवाने केलेला निसर्गाचा र्‍हास हे दिले आहे. किंबहुना ही कारणे सांगण्यासाठी शास्त्रज्ञांची गरज नाही. सरकारी नोंदींनुसार, २०१५मध्ये भूस्खलनाच्या फक्त ३३ घटना नोंद झाल्या होत्या. त्यांची संख्या २०१८मध्ये ४९६ आणि २०२० पर्यंत ९७२ वर पोहोचली. यावर्षी जवळपास ३००च्या वर भूस्खलनांची नोंद झाली. अशा या देवभूमी म्हटल्या जाणार्‍या उत्तराखंडमधील पर्वतीय भागात निसर्ग आपले रौद्ररूप कधीही धारण करू शकतो. याची टांगती तलवार केदारनाथला जाणार्‍या भाविकांच्या डोक्यावर कायम असते. मात्र, त्याबाबत उत्तराखंड सरकार आणि स्थानिक जनता जागरूक असल्याचे दिसत नाही.
व्यापारीकरण झालेल्या केदारनाथ यात्रेदरम्यान अनेक नकारात्मक गोष्टी समोर येतात. भाविक आणि पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी मोठ्या संख्येने डोंगरकापणी करण्यात आली आहे. भूस्खलनांमागील हे एक प्रमुख कारण मानले जाते. गौरीकुंड ते मंदिर दरम्यानच्या संपूर्ण रस्त्यावर पायी मंदिरापर्यंत जाणार्‍या भाविकांकडून प्लास्टिकचा कचरा फेकला जातो. स्वच्छतागृहांची योग्य सुविधा नसल्याने परिसरातील अस्वच्छता या यात्रेच्या पावित्र्याला बाधा पोहोचवते.

याशिवाय सर्वांत संतापजनक बाब म्हणजे मुक्या प्राण्यांचे केले जाणारे शोषण. पायी यात्रा करणे ज्यांना शक्य नाही, ते घोड्यांचा पर्याय निवडतात. मात्र एका घोड्याला दिवसातून दोन ते तीन वेळा भाविकांना घेऊन खेपा माराव्या लागतात. यातील अनेक घोडे हे शोषण असह्य झाल्याने प्राणत्यागही करतात. माझ्या केदारनाथ यात्रेदरम्यान मी दोन घोडे मृत्युमुखी पडलेले पहिले. असे दररोज एक किंवा दोन घोडे आपले प्राण सोडत असतात अशी माहिती इथल्या स्थानिकांनी दिली. हे घोडे स्थानिकांच्या उपजीविकेचे साधन जरी असले तरी त्याचे होणारे शोषण सहन करण्यासारखे नाही. या सर्व गोष्टी या यात्रेच्या नकारात्मक बाजू असून राज्य सरकार आणि प्राणी संघटनेने याची दखल घेण्याची गरज आहे. केदारनाथ मंदिराचा परिसर हा पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने वाढत असलेल्या पर्यटक आणि भाविकांच्या संख्येवर निर्बंध आणण्यासाठी धोरण निश्चित केल्यास कचरा, अस्वच्छता आणि मुक्या प्राण्यांवरील होत असलेले अत्याचार काही अंशी कमी होतील असे मत काही ट्रेकर्स व्यक्त करत आहेत.

केदारनाथ यात्रेची ही काळी बाजू पाहायला मिळत जरी असली तरी केदारनाथ मंदिर परिसरात पोहोचताच एक वेगळी दिव्य अनुभूती होते, जी शब्दात सांगणे जवळपास अशक्य आहे. या यात्रेसाठी घेतलेल्या कष्टांना साफल्य देणारा तो एक अलौकिक अनुभव असतो. हा अलौकिक अनुभव घेत असताना महादेव रौद्ररूप तर धारण करणार नाही ना ह्या भीतीचे जे सावट भाविकांच्या मनावर असते, ते जर प्रयत्नांती दूर करता आले, तर हा अनुभव अधिक संस्मरणीय ठरेल.