आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज दि. १ नोव्हेंबर रोजी गोव्यात येत आहेत. केजरीवाल यांनी काल ३१ ऑक्टोबर रोजी एका ट्विटद्वारे आपण गोव्यात येत असल्याचे म्हटले आहे. या ट्विटमध्ये केजरीवाल यांनी, आमच्या जीवनात धार्मिक स्थळे आणि तीर्थक्षेत्रे यांची महत्त्वाची भूमिका आहे. केवळ देवाच्या आशीर्वादानेच आपल्याला नवी ऊर्जा आणि नवी दिशा मिळते. मी माझ्या गोव्यातील बांधवांशी बोलण्यासाठी उद्या गोव्यात येईन असे ट्विट त्यांनी केले आहे अशी माहिती आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी दिली.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यापूर्वी गोव्यात येऊन गोवेकरांना मोफत वीज आणि नोकरीची हमी दिली आहे. आपचे कार्यकर्ते सध्या गोव्यात दिवसाला ७५ बूथ सभा आणि दिवसातून २ रॅली घेऊन येत्या गोवा विधानसबा निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. गेला महिनाभर अशा सभांद्वारे आप निवडणुकीची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. आपने आतापर्यंत १७०० बूथ सभा घेतल्या आणि १,१२,०५६ लोकांनी आपच्या रोजगार हमी कार्यक्रमासाठी स्वाक्षर्या केल्या आहेत. तसेच २,५०,००० गोवेकरांपर्यंत ही यात्रा पोहोचली आहे अशी माहिती आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी दिली.
यापूर्वी केजरीवाल दोन वेळा राज्याच्या दौर्यावर आले आहेत. सोमवारी राज्याचा ते तिसरा दौरा करणार आहेत. आपमध्ये दयानंद नार्वेकर, बाबू नानोस्कर, सत्यविजय नाईक, राजदीप नाईक, गणपत गावकर, डॉमिनिक गावकर, रितेश चोडणकर आणि अमित पालेकर यांसारख्या नेत्यांनी अलीकडेच प्रवेश केल्याने पक्षाला बळकटी मिळाली आहे. पक्षाने आणि पक्षाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कठोर परिश्रमामुळे पक्षाने खर्या अर्थाने गोव्यातील मतदारांना सक्षम केले आहे अशी माहितीही म्हांबरे यांनी दिली.
अरविंद केजरीवाल यांनी गेल्या महिन्यात गोवा दौर्यावर असताना राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास प्रत्येक तरुणाला रोजगार देण्याची हमी जाहीर केली होती. तसेच जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक तरुणाला रोजगार आणि दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.
आजच्या आपल्या गोवा दौर्यात केजरीवाल हे गोव्यातील पक्षाचे नेते व विविध मतदारसंघातील प्रमुख यांच्या भेटी घेऊन येत्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. पणजीत त्यांची पत्रकार परिषदही होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
आम्ही केजरीवाल यांचे गोव्यात स्वागत करत असल्याचे यावेळी म्हांबरे यांनी सांगितले.
नितीन गडकरींचाही गोवा दौरा
दरम्यान, केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज दि. १ नोव्हेंबर रोजी गोव्यात येत असून त्याचा हा गोवा दौरा दोन दिवसांचा अधिकृत दौरा आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी हे आज सोमवारी एनएच- ५६६ वरील लोटली आणि वेर्णा आयडीसीमधील मिसिंग लिंकचे उद्घाटन करतील. त्यानंतर गडकरी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार आहेत. गोमेकॉतमध्ये त्यांच्या हस्ते यावेळी टेलिमेडिसिन सेवांचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी दोनापावल येथील हॉटेल ताजमध्ये मंत्री गडकरी ‘गती शक्ती मास्टर प्लॅन’वर उद्योगपतींशी संवाद साधणार आहेत.
उद्या दि. २ रोजी गडकरी क्रीडा खाते आणि दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी यांच्यामध्ये महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहेत. त्यानंतर श्री. गडकरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची आणि महामार्गाच्या कामांचा आढावा घेणार आहेत.