॥ नवजीवन – १ ॥ नमन तुला हे, नवजीवन!

0
78
  • प्रा.रमेश सप्रे

खरंच कोविडनंतरचं जीवन पूर्वीसारखं कधीच नसणार आहे. याला आता ‘न्यू नॉर्मल’ असा शब्दप्रयोग आलाय. त्यापेक्षा ‘नवजीवन’ किती अर्थपूर्ण आहे!
याविषयी आपण सहचिंतन करणार आहोत.

त्या घरातलं वातावरण साहित्यिक नि सांस्कृतिक असायचं. म्हणून आजुबाजूच्या लोकांना ते घर देवघरच वाटे. कुटुंबाला सहा कोन होते म्हणजे त्या षट्‌कोनी कुटुंबात पति-पत्नी, मुलगा-मुलगी नि त्यांचे आजी- आजोबा. प्रत्येकाचं विश्‍व वेगळं असलं तरी या विश्‍वांना सर्वबाजूंनी जोडणारे अनेक सेतू होते संस्कारांचे. त्यात प्रेमाचा सेतू होता तसाच सेवेचा, त्यागाचाही सेतू होता. केवळ परस्परांबद्दल सहानुभूती (सिंपथी) नव्हती, तर एकमेकांची सुखदुःख आतून समजून घेऊन त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणारी समानुभूतीही (एंपथी) होती. फार सुंदर नि घट्ट वीण होती त्या परिवाराची. कोविडच्या लॉकडाउन काळात ते कुटुंब खचलं नाही, त्रासलं नाही. पूर्वीच्या कथाकहाण्यात असायचा ना? – ‘उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.’ वसा म्हणजे व्रत. त्या कुटुंबाचं कोणतं व्रत होतं? ते त्यांनी दाराभिंतींवर ‘मिशन स्टेटमेंट’ , ‘ध्येयवाक्य’ अशा स्वरूपात केवळ लिहिलं नव्हतं. कारण नुसत्या लिहिलेल्या शब्दांना नि आकड्यांना रंग- वास नसतो. त्यांच्यात रक्त नसतं. जिवंत ठेवणारं!
हल्लीची वृत्तं नि वृत्तांत पहा कसे निर्जीव असतात! रक्तलांछित हिंसेचे, पाशवी बलात्काराचे सचित्र वृत्तांतही शवविच्छेदना (पोस्ट मॉर्टेम)सारखे असतात. मृत नि कबरीसारखं थंड. त्यात कर्तव्यभावनेची ऊब नसते, अन्यायाची चीड नसते, व्यक्तीच्या प्रतिष्ठेची कदर नसते, मूल्यांबद्दल आदर नसतो. फक्त ऊरबडवी भावशून्य सनसनाटी असते. आज वातावरणातीलच नव्हे तर एकूणच समाजातील, समाजसंस्थातील संघर्षाची, स्वार्थाची उष्णता खूप वाढलीय. खर्‍या माणुसकीवर आधारित संबंधांची ऊब वेगानं नष्ट होत चाललीय.

यासाठी केवळ संजीवन, पुनरुज्जीवनापेक्षा खरी गरज आहे ‘नवजीवनाची’. नव्या जीवनदृष्टीची नि नूतन जीवनशैलीची!
त्या षट्‌कोनी कुटुंबाचंच पहा ना. सतत रसरशीत नि रसमधुर भावबंधांचं कारंजं तिथं थुईथुई नाचत असतं. पिसारलेल्या सप्तरंगी मयूरासारखं!
कधीही गेलात तरी सर्वांच्या बोलण्यात शेवटी ‘ळू’ अक्षर असलेले वापरत असतील तर त्यात काळू-बाळू, हळूहळू, स्नेहाळू- कृपाळू- मायाळू- दयाळू असे शब्द सहज येऊन जातात. मुख्य म्हणजे हा अर्थपूर्ण संवाद असतो. ज्याचा क्लायमॅक्स बर्‍याच वेळानं धार्मिक- आध्यात्मिक वृत्तीच्या आजीनं केलेला असतो. अगदी भाजीचं अळू, कुणाला तरी झालेलं गळू (फोड) इथपासून ते फुले माझी अळुमाळू, वारा पाहे चुरगळू… पर्यंत. सारे बोल कसे निर्विष असतं. ते संभाषण असतं प्रेमळ संवाद नि स्नेहल संगीतासारखं.
त्या दिवशी सहज भेटायला म्हणून त्या ‘माहेर’घरी गेलो होतो. मोठं ‘शक्तिघर (पॉवर हाऊस)’ होतं ते कुटुंब. अनेकजण आपल्या मनाबुद्धीची बॅटरी चार्ज करून घेण्यासाठी तिथं जात. फारसं सधन नसलं तरी त्या कुटुंबाचं मन मोठं विशाल होतं. ‘हे विश्‍वचि माझे, नव्हे आमुचे घर’ या सच्चा भावात सारे वावरत असत.

सर्वांचं आगत- स्वागत- पंगत झाल्यावर आस्थेनं सर्वांची विचारपूस होई. त्याला चहाडी- चुगली- गॉसिपचं स्वरूप कधीच नसायचं. बाहेरून आलेली व्यक्ती ‘मी फक्त काही आनंद मिळवायला आलोय’ किंवा ‘काही सकारात्मक विचार कल्पना मनाच्या पिशवीत भरून घ्यायला आलेय.’ अन् व्हायचंही तसंच. येणार्‍या व्यक्तीचा आनंदमूल्यांक (हॅपिनेस इंडेक्स) येताना असायचा त्यापेक्षा जाताना अनेक पटींनी वाढलेला असे.
तर त्या दिवशी एक निराळाच शब्दखेळ (वर्डगेम) त्या घरातील व्यक्तींमध्ये सुरु होता. सारेजण जेवणाच्या टेबलावर एकत्र बसले होते. हे अर्थातच दुपारच्या जेवणासाठी सुटीच्या दिवशीच शक्य असे. रात्रीचं भोजन मात्र न चुकता सर्वांनी एकत्रच घ्यायचं असा त्या घराचा शिरस्ता (रिवाज) होता.

तो दिवस सुट्टीचा होता. दुपारी गेल्यामुळे नि जेवायची वेळ असल्याने जेवण्याचा आग्रह झाला. जो अगदी प्रामाणिक असल्यानं मोडणं अशक्य होतं. जेवायला सुरवात झाल्यावर बाबा एकदम म्हणाले… ‘हाच तो चहा!’ सर्वांच्या मुद्रेवर आश्‍चर्याचे भाव पाहून बाबा म्हणाले, ‘कुठल्याही प्रत्यक्ष चहाबद्दल मी जेवताना कशाला बोलीन?- हे शब्दच असे आहेत की उलट्या क्रमानं उच्चारले तरी तसेच असतात. दुसरं कोणी सांगेल का असा शब्द? यावर आई उद्गारली ‘चिमा काय कामाची?’ सर्वांनी मनातल्या मनात उलट्या क्रमानं शब्द वाचले. त्यांना गंमत वाटली. आजोबा इंग्लिशवाले. त्यांनी दोन वाक्य सांगितली, मजेदार होती ती. ‘मॅऽम् ऍम् ऍऽम्!’ सर्वेशनं मनातल्या मनात जमेना म्हणून जेवायच्या ताटातच बोटानं लिहून पाहिलं. ‘बरोबर आहे आजोबा. किती छान! उद्याच आमच्या मॅम्‌ना (म्हणजे मॅडमना) ऑनलाइन म्हणतो. मॅम्‌चे नि मुलांचे असे संबंध पाहून बरं वाटलं. तेही ‘ऑन् लाइन्’! मनात आलं ते बोललं गेलं, ‘बरंय तुमचं ऑफ् लाइन् म्हणजे प्रत्यक्ष घरात मॉम् नि ऑन्लाइन मॅम!’ ते अगदी खरं होतं. कारण सर्वेश लगेच म्हणाला, ‘सर्व टीचर्स नाहीत काही, फक्त आमच्या इंग्लिशच्या मॅम्. वुइ रिअली मिस् हर!’ ऐकून छान वाटलं. आजोबांनी एक ऐतिहासिक वाक्य सांगितलं, ‘हे वाक्य नेपोलियननं एल्बा नावाच्या बेटावर आपल्या अखेरच्या कारुण्यपूर्ण काळात म्हटलं – एबल वॉज आय् एअर् (म्हणजे बिफोर्) आय् सॉ एल्बा’. तोपर्यंत आई म्हणाली, ‘रामाला भाला मारा’-(हा राम अर्थातच प्रभू श्रीराम नाही.)… आत्तापर्यंत शांत असलेली आजी म्हणाली, ‘मला बाई शब्दच माहीतायत. ‘नमन’ आणि ‘नवजीवन’… सर्वजण या शब्दांवर विचार करू लागले. आजी पुढे म्हणाली ‘सकस’ आणि ‘सरस’!
खरंच कोविडनंतरचं जीवन पूर्वीसारखं कधीच नसणार आहे. याला आता ‘न्यू नॉर्मल’ असा शब्दप्रयोग आलाय. त्यापेक्षा ‘नवजीवन’ किती अर्थपूर्ण आहे! याविषयी आपण सहचिंतन करणार आहोत. आत्तापर्यंत गप्प असलेली कलिका काहीतरी आठवून म्हणाली- मॅम्‌च कशाला मला सरांबद्दल एक वाक्य आठवलं … ‘सर् जाताना प्या ना ताजा रस!’ गंमत आहे नाही?