अहंकाराचा वारा न लागो …

0
96

योगसाधना – ५२५
अंतरंग योग – ११०

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आपल्या ऋषींनी- मुनींनी वेदांवर स्वतःची नावे लिहिली नाहीत. कारण त्यांना नावाची अभिलाषा किंवा कीर्तीची कामना नव्हती. आपल्या शिल्पकारांनीही आपल्या शिल्पांवर स्वतःची नावे कोरली नाहीत. म्हणूनच वेद अमर आहेत आणि शिल्पकृती चिरंजीव आहेत. त्यांनी अहम्‌ची समाधी लावून कर्म केले.

भारतीय लोक उत्सवप्रिय आहेत. तशीच आपली संस्कृतीदेखील विविध उत्सवांमुळे अगदी समृद्ध आहे. संपूर्ण वर्षभरात काही ना काही उत्सव हा असतोच. पण हे सर्व उत्सव फक्त कर्मकांडं अथवा मौजमस्ती म्हणून साजरे करायचे नसतात. त्यामागील उच्च ध्येय बघायला हवे.

आपल्या थोर, ज्ञानी ऋषीमहर्षींनी उच्च कोटीचे ध्येय समोर ठेवूनच प्रत्येक उत्सवाची रचना केलेली आहे. प्रत्येक उत्सवाचा संबंध कुठल्यातरी देव-देवतेशी, घटनेशी असतो. त्यांच्याशी जोडला जातो. त्यामुळे त्या उत्सवाला धार्मिक पैलूंबरोबर आध्यात्मिकपैलूही असतो. हा पैलू व्यवस्थित समजला की त्या उत्सवाची मजा काही वेगळीच असते. म्हणून हे ज्ञान जाणून घेणे अत्यावश्यक असते.
संपूर्ण वर्षभर जरी उत्सव असले तरी जास्तीत जास्त उत्सव अगदी लागोपाठ – आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्‍विन, कार्तिक या महिन्यांत असतात- म्हणजेच चातुर्मासात- आषाढी शु. एकादशी (देवशयनी एकादशी) ते कार्तिक शुद्ध एकादशी (देवउठी एकादशी).
पू. पांडुरंगशास्त्री या संदर्भात सांगतात – आषाढ शुद्ध एकादशीपासून प्रभू झोपी जातो. त्यामागे एक सुंदर कल्पना आहे. भावपूर्ण आहे.

  • यथा देहे तथा देवे!
  • ही भाविक भक्तांची कल्पना इथे दिसून येते. – मला जे आवडते ते प्रभूला आवडते. या भावानेच भक्त प्रभूला फूल, अत्तर, प्रसाद इ. वस्तू अर्पण करतो. भक्ताला स्नान आवडते म्हणून तो देवालाही स्नान घालतो. भक्ताला उत्तम कपडे घालायला आवडतात म्हणून प्रभूलाही सुंदर, जरीचे कपडे घालतो. काम करून स्वतः थकून जातो म्हणून स्वतःप्रमाणे त्याचा भगवानही आराम करतो. भगवान झोपतो कारण विश्‍वाचा व्यवहार चालवता चालवता तो थकून जात असेल म्हणून त्यालाही आराम पाहिजे. त्यानेही चातुर्मासात झोपले पाहिजे- असा भक्तीशील हट्टदेखील भक्ताने केलेला असेल. हा भक्तीशील हट्टच देवशयनी या कल्पनेत सौंदर्य व माधुर्य यांची वेलची-केशर घालतो.

खरेंच, किती रम्य कल्पना आहे ही! आपण रोज अथवा सणाच्या वेळी पूजाअर्चा करतो. त्यावेळी हे सर्व करतो – देवाला पाण्याने अभिषेक म्हणजे आंघोळ, तदनंतर पंचामृताचा अभिषेक (पुष्टी मिळवण्यासाठी), छान छान कपडे घालतो, फुले घालतो, गंध लावतो, धूप- दीप- आरती करतो, नैवेद्य दाखवतो – फळांचा, भोजनातील विविध वस्तूंचा- वरण, भात, तूप, भाज्या, काहीतरी गोड पदार्थ जसे खीर, शिरा… केव्हा केव्हा फक्त केळे व साखरेचा नैवेद्य असतो.

मुख्य म्हणजे भगवंत यातले काहीही खात नाही. आपणच प्रसाद म्हणून खातो. धन्यता मानतो. पण त्याचवेळी भले मोठे गार्‍हाणे घालायला विसरत नाही. गार्‍हाणे म्हणजे विविध मागण्यांची मोठी यादी. पुरोहिताने पूजा केली तर विचारूच नका. ते गार्‍हाणे लांबलचक असते. त्यामध्ये दया, कृपा, विविध इच्छा… सगळे सगळे असते.

यात काहीही वावगे नाही. जी सर्वसमर्थ आहे तिच्याकडेच आपण मागायचे असते. पण एक विचार सहज येतो की यातील अनेक गोष्टी ज्या आपण भगवंताला अर्पण करतो त्या भगवंतानेच बनवल्या आहेत अथवा त्याच्याच कृपेने आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. ही भावपूर्ण कृतज्ञता असणे आवश्यक आहे. असा विचार केला की कर्मकांडाला आध्यात्मिकतेचा सुगंध येतो. मानवाचा जीवनविकास होण्यास मदत होते. तसेच पूजाअर्चा करण्यास व्यक्ती आनंदाने तयार होते. त्यात एकाग्र होते. नाहीतर अन्य कामासारखा पूजा एक व्यवहार होतो.
पू. शास्त्रीजी दुसरा विचार समजावतात

  • या सर्व कल्पनांहून श्रेष्ठ अशी एक कल्पना आहे. कर्मयोग्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रभू झोपून जातो. हे चार महिने म्हणजे चातुर्मास. सामान्य प्रसंगातही जर भगवान झोपला तर सृष्टीचे व्यवहार चालणार नाही. मग चातुर्मासासारख्या अमूल्य काळात, ज्यावेळी सृष्टीत जल व अन्नाची व्यवस्था करायची असते त्यावेळीच भगवान झोपतो.. हे कसे चालेल?
    काही लोकांना ‘भगवान झोपतो’ ही कल्पना जुनी पुराणातून शोधून काढलेली कथा वाटते. पण तसे नाही.
    वर्षा ऋतूत सृष्टीचे सौंदर्य सोळाही कलांनी फुलून उठते. मानवाला जीवन मिळते. शेतकर्‍याला मुबलक पीक मिळते. सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरते. भगवंताच्या कृपेने न्हाऊन निघालेला कृतज्ञ बुद्धीचा मानव मंदिरात जाऊन प्रभूचे गुण गाताना थकत नाही.
  • माझे वैभव तुझ्या कृपेचे फळ आहे – असे जेव्हा मानव प्रभूला सांगतो त्यावेळी प्रभू त्याला जणू उत्तर देतो की –
    ‘‘मला माहीत नाही. मी तर चार महिने झोपलेलो होतो. हे सर्व वैभव आणि समृद्धी तुझ्या कामाचे, परिश्रमाचे व पुरुषार्थाचे फळ आहे.’’
    काम करताना सतत जागृत राहणे आणि फळ येते त्यावेळी माहीत नसल्याचा बहाणा करून झोपी जाणे याच्यापेक्षा महान हृदयाची विशालता दुसरी कोणती असू शकेल का? खर्‍या कर्मयोग्याला याच्यापेक्षा दुसरे श्रेष्ठ मार्गदर्शन कोणते होऊ शकते? भावनेच्या दृष्टीने ही कल्पना जेवढी आर्द्र वाटते तेवढीच विचारांच्या दृष्टीनेही माधुर्यपूर्ण वाटते.’’
    खरेंच हा दृष्टिकोन कर्मयोग्यांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक आहे.
    शास्त्रीजी आणखी वेगळे विचारही मांडतात.
  • कर्म करा पण अभिमान करू नका. कर्म करताना ‘मी’ची समाधी लागू दे. ‘अहम्’ला गाडा, झोपू द्या. प्रभू झोपी गेला म्हणजे अहम् राखल्याशिवाय तो कर्म म्हणजे जगव्यवहार करीत राहील.
    ‘तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्’
  • गीतेच्या वचनानुसार तो जगावर करुणा वर्षवता वर्षवताही अकर्ता राहिला.
    कर्ता ज्यात स्वतःला विसरून जातो, लुप्त होतो, समाधिस्थ होतो ती कृती श्रेष्ठ बनते. कृती सुंदर लागते कारण तिचा निर्माता तिच्यात एकरूप झालेला आहे. आज आपल्याला कीर्ती व स्तुती आवडते. कोणी स्तुती करतो तेव्हा झोपी जाण्याची गोष्ट बाजूलाच राहिली पण कुणी झोपलेला असेल तर त्याला जागवून आपण स्वतःची स्तुती करू लागतो.
    अहंकारयुक्तपणे केलेले काम काळाच्या उदरात जळून खाक होते.
  • काळः पिबति तद् रसम्‌|
  • काळ त्याचा रस पिऊन टाकतो.
    आपल्या ऋषींनी- मुनींनी वेदांवर स्वतःची नावे लिहिली नाहीत. कारण त्यांना नावाची अभिलाषा किंवा कीर्तीची कामना नव्हती. आपल्या शिल्पकारांनीही आपल्या शिल्पांवर स्वतःची नावे कोरली नाहीत. म्हणूनच वेद अमर आहेत आणि शिल्पकृती चिरंजीव आहेत. त्यांनी अहम्‌ची समाधी लावून कर्म केले. म्हणून आजही ते मानवाला मार्गदर्शन करायला समर्थ आहेत.

कार्याच्या दृष्टीने पाहतानासुद्धा त्याच कार्याला श्रेष्ठ समजू शकतो की जेथे महान कार्य दिसते पण कार्यकर्त्याला शोधावे लागते. कार्य कोणी केले हे कळून घेण्यासाठी परिश्रम करावे लागतात. खरा कार्यकर्ता शिखरावर चढून चमकण्यापेक्षा कार्यमंदिराच्या पायात स्वतःला गाडून घेण्यात धन्यता मानतो.

आजच्या जीवनात असा दृष्टिकोन फारच महत्त्वाचा आहे. कारण अनेक व्यक्ती विविध क्षेत्रात कार्य करतात- सामाजिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक… पण अनेकवेळा अहंकारामुळे त्यांचा ‘अहम्’ दृष्टिक्षेपात येतो. प्रत्येक ठिकाणी नकारात्मक घटना जास्त घडतात. षड्‌रिपू – काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर… जागृत झालेले दिसतात ज्यामुळे व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, विविध संस्था यांचा नाश होताना दिसतो अथवा त्यांची हवी तशी प्रगती होत नाही.

प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत- जिथे दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ- दिसून येतो. आपल्या भारत देशाकडेच जर नजर फिरवली की लक्षात अनेक उदाहरणे येतील. त्यामुळेच तर अगदी छोटे युरोपीय देश – पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज व पर्शियाहून आलेल्या मोगलांनी आमच्या एवढ्या मोठ्या, सुशिक्षित, सुसंस्कृत देशावर अगदी सहज राज्य केले. त्याचबरोबर निर्घृणपणे महाभयंकर अत्याचारसुद्धा केले आणि आपल्यातील अनेक व्यक्तींचा वापर करून घेतला.
सारांश – अहंकार नाश करतो स्वतःचा व इतरांचा. म्हणूनच संत म्हणतात –
‘अहंकाराचा वारा न लागो राजसा.’
चातुर्मासाबद्दलचे तत्त्वज्ञान प्रत्येकाला जीवनविकासासाठी फारच उपयुक्त ठरेल. गरज आहे ती अभ्यास, चिंतन व आचरणाची. आपले योगसाधक तर त्याच मार्गावर आहेत. (संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे पुस्तक – संस्कृती पूजन.)