खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

0
35

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यावर महामार्गाचे काम करणार्‍या कंत्राटदाराने ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. मात्र त्याबाबत ह्या कंत्राटदाराला गोवा सरकारने दोन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली. मात्र, त्याच्यावर कोणती कारवाई करायची याचा निर्णय केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच घेऊ शकते, असा खुलासाही सावंत यांनी केला.

पत्रादेवी-म्हापसा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाउस्कर यांनी दिली. गोवा विधानसभेत काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. तत्पूर्वी या महामार्गाच्या प्रश्‍नावरून खंवटे यांनी बांधकाम खात्याचे मंत्री पाउस्कर यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करून त्यांना जेटीस आणले.

खंवटे यांनी या महामार्गाचे बांधकाम करणार्‍या कंत्राटदाराने ठिकठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचा आरोप सभागृहात केला. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्यावरून धावणार्‍या वाहनांना अपघात होऊ लागले असून काही वाहनचालकांचे बळी गेले असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिली. या कंत्राटदारावर सरकार कारवाई का करीत नाही. तो सरकारी जावई आहे काय, असा सवालही खंवटे यांनी यावेळी केला.

यावेळी उत्तर देताना पाउस्कर यांनी या मार्गाचे ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचे मान्य केले. आणि त्यासंबंधी कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.

पणजी-वेर्णे रस्त्याची
दुरूस्ती लवकरच

दरम्यान, पणजी ते वेर्णे या दरम्यानच्या उड्डाण पुलाच्या रस्त्याची दुरूस्ती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. त्या उड्डाण पुलाच्या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असल्याचे विरोधी पक्षनते दिगंबर कामत यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिले. त्याचे दुरूस्ती काम कधी हाती घेण्यात येणार आहे अशी विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांनी ते काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. हे काम करणे ही सबंधित कंत्राटदाराची जबाबदारी असून त्याच्याकडूनच हे काम करून घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या महामार्गावर पर्वरी येथे उड्डाण पूल उभारण्यात येणार असून त्यांना विरोध करीत जे कोण सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत. त्या याचिकादारांशी सरकारची चर्चा चालू असून हा प्रश्‍न सामोपचाराने सोडवण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘संजीवनी’वरील सूचना चर्चेस नाही

>> विधानसभेत ढवळीकरांसह प्रसाद गावकर यांचीही नाराजी

संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्‍नावरून आपण मांडलेली लक्षवेधी सूचना सभापती राजेश पाटणेकर यांनी चर्चेस न घेतल्याच्या प्रश्‍नावरून काल मगो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल गोवा विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी ढवळीकर यांनी, सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांच्यासह ठाण मांडले. मात्र, याचवेळी सभापतींनी पहिल्या सत्रातील कामकाज तहकूब केले.

तत्पूर्वी ढवळीकर यांनी सभापतींशी वाद घालताना आपण गेल्या तीन अधिवेशनात लागोपाठ संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्‍नावर विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत आहे. सतत तीनवेळा आपण ही लक्षवेधी सूचना चर्चेस न घेतल्याचे सांगून त्यांच्याशी शाब्दीक वाद घातला.
यावेळी बोलताना सभापती पाटणेकर यांनी, यंदाचे अधिवेशन हे केवळ दोन दिवसांचे आहे. आणि एकूण १८ लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या होत्या. त्यामुळे वेळ खूपच कमी असल्याने तुमची लक्षवेधी सूचना चर्चेसाठी घेता आली नसल्याचे स्पष्ट केले.
यामुळे संतप्त बनलेल्या ढवळीकर यांनी सभापतींशी वाद घातला व नंतर त्यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेवर जाऊन ठाण मांडले. यावेळी अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांनीही त्यांना साथ देत त्यांच्याबरोबर तेथे ठाण मांडले.