म्हादई ः दिल्लीत आजपासून सुनावणी

0
87

गोव्याच्या दिशेने येणारा म्हादईचा प्रवाह पूर्णपणे खंडित करून म्हादई अभयारण्याकडे येणारे पाणी नैसर्गिकरित्या कळसातून मलप्रभेत जाईल अशा प्रकारची व्यवस्था कर्नाटकाने केलेली असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा सपाटा लावलेला आहे. या प्रश्‍नी आजपासून होणार्‍या सुनावणीत गोव्याने आक्रमक रणनीती आखण्याची गरज निर्माण झालेली आहे.
कर्नाटक निरावरी निगमने गोव्याला पाणी मिळू नये यासाठी चंगच बांधलेला असून सर्व नियम धाब्यावर बसवून गोव्याकडे येणारा पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी शिस्तबद्ध आखणी केली आहे. काल पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन येथील कामांचा आढावा घेतला असता कर्नाटकाची चाल यशस्वी होण्यासाठी अनेक प्रकारे कर्नाटकाने तयारी केल्याचे चित्र दिसून आल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, दर बारा वर्षांनी या ठिकाणी जत्रा भरते. ते तळे कळसा कालवाच्या कामामुळे उद्ध्वस्त झाल्याने संतप्त नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर हे काम हाती घेण्यात आले असून ते पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी हट्ट धरलेला आहे.
दरम्यान, गोव्याची तुकडी दिल्लीत दाखल झालेली असून आत्माराम नाडकर्णी, दत्तप्रसाद लवंदे, जलसंसाधन खात्याचे संदीप नाडकर्णी, पी. जे. कामत यांनी सुनावणीच्या पूर्वी आपली रणनिती ठरवण्यासाठी बैठक घेऊन विचारविनिमय केल्याचे दिल्लीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. कर्नाटकाच्या साक्षीदाराची उलट तपासणी होणार असून कर्नाटकाचे खोटे कारनामे उघड करण्यासाठी गोव्याची टीम सज्ज झाल्याचे लवंदे यांनी स्पष्ट केले. सुनावणी २६ मे पर्यंत चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या दरम्यान साक्षीदारांची उलट तपासणी व इतर संबंधित क्रिया पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.