वास्कोत टिळक मैदानावर सुरू असलेल्या एमपीटीच्या नियोजित प्रकल्पांवरील जनसुनावणीस गोव्याबाहेरील लोकांची उपस्थिती असते या एमपीटीच्या वक्तव्याचा निषेध करणारा ठराव काल पालिका मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे गेले सात दिवस सकाळ ते रात्रीपर्यंत ही सुनावणी घेतली जाते. या जनसुनावणी दरम्यान एमपीटीने एक पत्रक काढून उपस्थित सगळे लोक गोव्यातील नव्हे तर बाहेरचे असतात असे म्हटले होते. त्याला सर्वांनी आक्षेप घेऊन एमपीटी अधिकार्यांचा निषेध करीत एमपीटी अध्यक्षांना या जनसुनावणीत उपस्थित राहून उत्तर द्यावे अशी मागणी केली होती. मात्र, एमपीटी अध्यक्ष आजपर्यंत या जनसुनावणीस हजर राहिलेले नाहीत. दरम्यान, काल याविषयी पालिका मंडळाच्या बैठकीत एमपीटीच्या वरील वक्तव्याचा सर्वांनी एकमताने ठराव संमत करून निषेध केला.