>> वाहतूक परवाने जमा करण्याचे निर्देश
डिजिटल मीटर बसवण्यास नकार देणार्या सुमारे तीन हजार पर्यटक टॅक्सींचा वाहतूक परवाना रद्द करण्यासंबंधीची नोटीस वाहतूक खात्याने त्यांना बजावली आहे. ह्या नोटीसमध्ये टॅक्सी मालकांना १५ दिवसांत परवाना खात्याकडे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. ह्या टॅक्सींमध्ये शापोरा, कळंगुट व कांदोळी या भागातील बहुतांश टॅक्सींचा समावेश आहे.
वाहतूक खात्याने परवाना रद्द करणारी नोटीस बजावल्याने या सर्व टॅक्सी सध्या बंद आहेत. त्यामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.
डिजिटल मीटर बसवण्याची सक्ती सरकारने मागे घ्यावी, अशी मागणी हे टॅक्सीचालक करीत आहेत. राज्यातील पर्यटक टॅक्सीवाले पर्यटकांकडून भरमसाठ भाडे घेत असल्याचे दिसून आल्याने गोवा ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका सादर करून सर्व टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्याची मागणी केली होती. या याचिकेवर निवाडा देताना खंडपीठाने हे मीटर बसवण्याचा टॅक्सीवाल्यांना आदेश दिला होता.
मात्र, टॅक्सीवाल्यांनी आपण मीटर बसवणार नसल्याचे सांगून मीटर बसवण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्या पार्श्वभूमीवर मीटर न बसवल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा वाहतूक खात्याने टॅक्सीवाल्यांना दिला होता. आता खात्याने सुमारे तीन हजारच्या आसपास टॅक्सीवाल्यांना परवाना रद्द करण्यासंबंधीची नोटीस पाठवली आहे.