अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबानने मंगळवारी रात्री आपली पहिली पत्रकार परिषद घेतली आणि संपूर्ण जगाला पडलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याचा आव आणला. महिलांचे स्वातंत्र्य, मानवाधिकार, सार्वत्रिक माफी, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य, आदी विषयांवर जगाला आश्वस्त करताना हे सगळे काही आमच्या धर्माच्या आणि ‘शरिया’च्या चौकटीत असेल हे पदोपदी सांगायला पत्रकार परिषद घेणारा त्यांचा नेता झबिउल्ला मुजाहिद विसरला नाही. महिलांनी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करावे, त्यांना सर्व स्वातंत्र्य असेल, प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य असेल, असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे मात्र हे सगळे आमच्या धर्माच्या चौकटीत राहील असे सांगायचे ह्यातच तालिबानचा दुटप्पीपणा उघड होतो. एकीकडे सार्वत्रिक माफीची घोषणा करणार्या तालिबानचे हस्तक दुसरीकडे आपल्या जुन्या दुष्मनांच्या पुतळ्यांवरही राग काढू लागले आहेत, ते जिवंत माणसांना अभयदान देण्याची शक्यता फारच कमी आहे. तालिबान्यांचा मानवाधिकार हा तर खासा विनोद झाला. गेल्यावेळच्या आपल्या अमानुष आणि खरे तर रानटी राजवटीचे जोखड मानेवर असल्याने ते दूर सारून स्वतःची प्रतिमा सुधारण्याची धडपड अमेरिकेच्या माघारीने आणि चीन, रशिया, कतारच्या पंखांखाली राहिल्याने शेफारलेले तालिबानी करीत आहेत. मानवाधिकार कशाशी खातात हे तरी ह्या राक्षसांना माहीत असेल का शंका आहे.
मुळात ज्या शरियाचा हवाला ते देत आहेत, तो कोठेही लिखित स्वरूपात नाही. त्याचा जसा अन्वयार्थ लावायचा तसा लावता येतो आणि लावला जातो. तालिबान्यांचे कडवेपण सर्वज्ञात आहे. गेल्या राजवटीमध्ये त्याचा प्रत्यय संपूर्ण जगाला आलाच आहे. चाबकाचे फटके मारायचे, दगडांनी ठेचायचे, सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या साक्षीने ठार मारायचे, हातपाय तोडायचे, डोळे काढायचे. अमानुषपणाच्या सगळ्या सीमारेषा पार करणारे हे तालिबानी एकाएकी आपल्या मूळ विचारधारेला सोडून देऊन अमेरिकी उदात्त मानवतावाद स्वीकारतील अशी अपेक्षा करणेच भोळसटपणाचे आहे. पुरुषांनी दाढी ठेवलीच पाहिजे, बायकांनी संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालूनच बाहेर पडायचे. एकटीने बाहेर पडायचे नाही, शाळांत जायचे नाही, कला, मनोरंजन सगळे बंद अशा राजवटीचा पूर्वानुभव असल्यानेच काबुल विमानतळावर सोमवारी ती प्राणांतिक पळापळ झाली. अशा राजवटीखाली मृतप्राय जीवन जगण्यापेक्षा मरणे परवडले अशा विचाराने हजारो अफगाण नागरिक देशाबाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत.
तालिबानपाशी खरे तर अफगाणिस्तानसारखा प्रचंड देश संपूर्णतः ताब्यात घेण्याएवढे मनुष्यबळ नव्हते. सुरवातीला त्यांना बराच संघर्ष करावा लागला. परंतु अमेरिकेने पूर्णतः हात वर केले आणि त्यांच्या पदराखाली सत्ता चालवणार्या अश्रफ घनी सरकारचे धाबेच दणाणले. अमेरिकेने वीस वर्षे प्रशिक्षण दिलेल्या अफगाण सैन्याची जी दाणादाण उडाली ती बोलकी आहे. तालिबानच्या हाती आज अमेरिकेचा सारा शस्त्रसंभार लागला आहे. त्यातून त्यांची ताकद प्रचंड वाढली आहे. अफगाणिस्तानमधील नैसर्गिक संसाधनांवर डोळा ठेवणार्या चीनचे पाठबळ तर आहेच. त्यामुळे केवळ बाह्य जगाशी संबंध कायम ठेवून आपले आर्थिक स्त्रोत बळकट करण्यासाठी तालिबान ‘गुड तालिबान’ असल्याचा आव आणीत आहे. आपल्या नियोजित सरकारमध्ये इतर जमातींना हे पश्तुनी तालिबानी किती स्थान देतील त्यावरूनच त्यांचे सर्वसमावेशकतेचे पितळ उघडे पडेल. अमेरिकेच्या दबावाखाली भले तूर्त हे सामंजस्य दाखवले जाईल, परंतु काळाच्या कसोटीवर ते टिकले पाहिजे.
पंजशीर खोर्यातील स्व. अहमदशहा मसूदच्या नेतृत्वाखालील नॉर्दर्न अलायन्सचे अनुयायी तालिबानी राजवट मुकाट स्वीकारतील अशी शक्यता नाही. अमरुल्ला सालेहने काल स्वतःला अश्रफ घनींनंतर आपण कार्यकारी अध्यक्ष असल्याचे जाहीर केले आहे त्याचा अर्थ हाच आहे. जलालाबादेत अफगाण ध्वज काढण्यावरून तालिबान्यांशी नागरिकांचा संघर्ष झडला. ज्या अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आज काढता पाय घेतला आहे, तीच उद्या चीनचा तेथे प्रभाव वाढू लागला की स्थानिक बंडखोरांच्या मदतीने तालिबान्यांविरुद्ध षड्यंत्रे आखू लागेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. काल कतारहून कंदाहारमध्ये परतलेल्या तालिबानी नेतृत्वासाठी सध्या स्वर्ग दोनच बोटे उरला आहे एवढे खरे!