गुंड अन्वर शेखचा भावांकडूनच खून

0
99

गोव्यात व गोव्याबाहेर दहशत निर्माण करून लुटमार, बलात्कार करणार्‍या तसेच खून व दरोडाप्रकरणी पोलिसांना हवा असलेला कुप्रसिद्ध गुन्हेगार अन्वर शेख याचा उत्तर कर्नाटकातील हावेरी शिरशी येथे काल रविवारी त्याच्या तीन भावांनी खून केला.

गेल्या १६ फेब्रुवारी रोजी आर्ले चार रस्त्यावर सहा जणांनी शेख अन्वर याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यावेळी तो जखमी झाल्याने त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू होते. त्यातून बरा झाल्यावर तो कारवार येथे रहायला गेला होता.

शिरशी कर्नाटक येथे त्याचे तीन भावांसह कुटुंब रहाते. तो शिरशी येथे जाऊन कुटुंबाकडे वारंवार पैसे मागत होता. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी त्यांना देत होता. या त्याच्या सततच्या जाचाला त्याचे भाऊ कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी त्याचा काटा काढायचे ठरवले. त्यानुसार काल रविवारी अन्वर हा आपल्या घरी पैसे मागण्यासाठी गेला असता त्याचे भाऊ व त्यांच्यामध्ये भांडण झाले. त्यावेळी भावांनी रागाच्या भरात आपल्याकडील धारदार परशूने शेख अन्वरच्या डोक्यावर प्रहार केला. त्यात अन्वर शेख याचा मृत्यू झाला.