कुंकळ्ळीत गॅरेजला आग, ७ वाहने जळून खाक

0
94

>> २० लाख रुपयांचे नुकसान

दांडेवाडो, कुंकळ्ळी येथे काल रविवारी पहाटे ४.३० वा. एसकेबी या चारचाकी वाहन दुरूस्ती गॅरेजला अचानक आग लागली. यामुळे तेथे दुरूस्तीसाठी आणलेल्या ७ गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्यामुळे सुमारे २० लाख रुपयांची हानी झाल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली.

काल पहाटे ही आग लागल्याचे समजताच कोणीतरी अग्निशामक दलाला याबाबत वृत्त दिले. तात्काळ दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण तोवर कित्येक वाहनांनी पेट घेतल्याने आगीला आवरणे कठीण गेले. शेवटी दोन तासांनंतर ती आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. आग विझवताना तेथील काही वाहने गॅरेजमधून बाहेर काढल्याने ती सुखरूप राहिली.

या आगीत ७ चारचाकी वाहने जळून खाक झाली. आगीत २० लाखांपेक्षा जास्ती रुपयांची हानी झाली. मात्र अग्निशामक दलाने ३० लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची मालमत्ता वाचविली. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही.