भारत-चीन सीमावादावरील चर्चेची १२वी फेरी फलदायी

0
43

>> गोग्रामधून दोन्ही देशांचे सैनिक मागे

भारत-चीनमध्ये सीमावादावरून झालेल्या चर्चेच्या १२ व्या फेरीचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. या फेरीनंतर दोन्ही देशांचे सैनिक पूर्व लडाखमधील गोग्रामधून मागे हटले आहेत. तेथे बांधलेल्या सर्व तात्पुरत्या वास्तूही हटवण्यात आल्या आहेत.

भारतीय लष्कराकडून याबाबत माहिती देण्यात आली. भारत आणि चीनच्या सैन्याने टप्प्याटप्प्याने, समन्वय साधत आणि पडताळणी करत गोग्रातील आघाडीच्या ठिकाणांवर सैनिकांची तैनाती थांबवली आहे. याचबरोबर सर्व तात्पुरत्या वास्तू नष्ट करून परस्पर पडताळणी करण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे.

भारती-चीन सैन्यात कमांडर स्तरावर पूर्व लडाखमधील चुशुल-मोल्डेमध्ये १२ व्या फेरीची चर्चा झाली होती. दोन्ही देशाच्या सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याबाबत चर्चा केली. तसेच दोन्ही बाजू गोग्रामधून सैनिक हटवण्यावर सहमत झाले. या भागात गेल्या वर्षी दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आले होते. चर्चेनंतर दोन्ही देशांच्या सैन्याने गोग्रामध्ये सैनिकांची तैनाती बंद केली. तसेच गोग्रामधून ४ व ५ ऑगस्टला सैनिक मागे हटले. दोन्ही देशांचे सैनिक आता आपापल्या स्थायी ठिकाणी आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात १४ जुलैला बैठक झाली होती. यावेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एकतर्फी कुठलाही बदल स्वीकारणार नाही. पूर्व लडाखमध्ये शांतता स्थापन केल्यावरच दोन्ही देशातील संबंध सुधारू शकतील, असे भारताने स्पष्ट केले होते.