सुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद गावस व अन्य आठ जवानांनी बोट तसेच दोरीच्या साह्याने सुखरूप सुटका केली. त्यातील २५ लोकांना इतर ठिकाणी स्थलांतरित केले आहे.
साळ येथे काही लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. साळमधील भूमिका मंदिर वघरांत पुराचे पाणी शिरले. कारापूर येथील सुमारे १५ घरांमध्ये पाणी शिरले. दरम्यान, डिचोली तालुक्यातील सुमारे ११० घरांना पुराचा फटका बसला असून लाखोंची हानी झाली आहे. तसेच शेती बागायतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल डिचोली तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त जनतेशी संवाद साधत त्यांना सर्व ती मदत देण्याची हमी दिली. पाळी, कोठंबी, कारापूर, गावठण साखळी, हरवळे, आमोणा व इतर भागांतील पूरग्रस्त भागाची सकाळच्या सत्रात मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. अस्मानी संकटामुळे अनेकांची घरे गेली. शेती बागायतीचे नुकसान झाले. तसेच सरकारी मालमत्तेचीही हानी झाली. सर्व नुकसानग्रस्तांना सरकार सर्व ती मदत पुरवणार असल्याची हमी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.