अरविंद केजरीवाल आज गोव्यात

0
114

>> आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दौरा

आम आदमी पार्टीचे प्रमुख व नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज गोव्यात येणार आहेत. त्यांनी स्वत:च काल ट्विट करून ही माहिती दिली असून, या ट्विटमध्ये त्यांनी गोव्याला बदल हवा, असेही म्हटले आहे. केजरीवाल हे आज दुपारी २.३० वाजता दाबोळी विमानतळावर दाखल होणार असून, दि. १४ जुलै रोजी ते पत्रकारांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

गोव्यात आमदारांची खरेदी-विक्री करण्याचे घाणेरडे राजकारण पुरे झाले. आता गोव्याला विकास हवा आहे. उद्या (दि. १३) गोव्यात भेटू, असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पक्षाकडे निधीची कोणतीही कमतरता नसून, फक्त प्रामाणिक हेतूची गरज आहे. तसेच गोव्याला स्वच्छ राजकारणाची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या पार्श्‍वभूमीवर आपचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी सांगितले की, दहा दिवसांपूर्वीच ‘चला, गोव्याचे राजकारण स्वच्छ करूया’ ही मोहीम पक्षाने सुरू केली आहे. भाजप-कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष गोमंतकीयांच्या भावनांशी खेळत आहेत. या दोन्ही पक्षांनी आमदार खरेदी-विक्रीचा जो खेळ चालवला आहे, तो संपुष्टात आणण्याची वेळ आली आहे. अरविंद केजरीवाल हे गोवा दौर्‍यावर येत असून, त्यांच्याकडून प्रामाणिक राजकारण व खर्‍या विकासावर आधारित ‘गोवा विकासाचे मॉडेल’ शिकता येईल, असेही त्यांनी सांगितले.