>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या परराज्यातील नागरिकांना राज्यात प्रवेश देण्यास मान्यता देण्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे विनंती केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
गोवा राज्यात लसीकरणावर जोर देण्यात आला आहे. राज्यासाठी आवश्यक लशींचा साठा केंद्र सरकारकडून प्राप्त होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्यात प्रवेशासाठी आरटी-पीसीआर तपासणी प्रमाणपत्राची सक्ती केली आहे. केवळ जीवनावश्यक साहित्य घेऊन येणार्या वाहन चालक आणि मदतनीस यांना प्रमाणपत्रातून वगळण्यात आले आहे. थर्मामीटरद्वारे त्यांचे तापमान तपासण्याची सूचना करण्यात आली आहे. गोवा सरकारने यापूर्वी एक याचिका दाखल करून आरटी-पीसीआर प्रमाणपत्र सक्ती मागे घेण्याची विनंती केली होती. तथापि, न्यायालयाने राज्य सरकारचा अर्ज फेटाळून लावला होता.
जिल्हाधिकार्यांकडून संचारबंदी
वाढीचा अधिकृत आदेश जारी
राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हाधिकार्यांनी संचारबंदी वाढीचा अधिकृत आदेश काल जारी केला. राज्यातील संचारबंदीची मुदत सोमवार २८ जून रोजी सकाळी ७ वाजता संपत आहे. राज्यातील संचारबंदीमध्ये आणखी सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. येत्या ५ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. राज्यात सध्या सुरू असलेली दुकाने सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात सकाळी ७ ते संध्याकाळी ३ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. कॅसिनो, मद्यालये, क्रीडा संकुल, सामाजिक सभागृह, जलक्रीडा, सिनेमागृह, मनोरंजन पार्क, धार्मिक संस्था बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.