>> गोमेकॉत सुपर स्पेशालिटी ब्लॉकमधील खाटा व वैद्यकीय सेवांचे उद्घाटन
राज्य सरकारने कोविड-१९ या साथीच्या रोगाच्या तिसर्या लाटेला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयारी केलली आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी पुरेशी पावले उचलेली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले.
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाच्या नवीन सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये १०० नवीन बेड व आवश्यक उपकरणे उभारली आहेत. त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार आंतोनियो फर्नांडिस, आमदार फ्रान्सिस्को सिल्व्हेरा, वेदांता लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौविक मुजुमदार, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, संदीप जैन, वेदांताचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी सुजत शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे मुख्यमंत्र्यांनी वेदांत कंपनीचा उल्लेख करताना, राज्यातील कोविड-१९ च्या महामारीच्या काळात राज्य सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावलेल्या कार्पोरेट्सच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. तसेच अनेक कॉर्पोरेट्सनी गोवा आणि देशभरात मदत केली आहे आणि त्यात वेदांताचा समावेश असून मुख्यमंत्र्यांनी वेदांताने कोरोना संसर्गाविरूद्ध लढा देण्यासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती दिली. या १० कोटी रुपयांव्यतिरिक्त वेदांताने ३ टन द्रव स्वरूपातील वैद्यकीय प्राणवायू दैनंदिन तत्वावर पुरविला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कृती दलाची स्थापना
या कोरोना महामारीच्या संसर्गामुळे अनेक जणांचे प्राण गेले असून ते सारे आमच्यासाठी मौल्यवान होते. कोविड १९ च्या तिसर्या लाटेला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने कृती दलाची आणि राज्य कार्यकारी समितीची स्थापना केली असल्याचे मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले.
तिसर्या लाटेसाठी
सज्ज आहोत ः राणे
आरोग्यमंत्री श्री. राणे यांनी, सध्या प्रत्येकजण तिसर्या लाटेच्या संभाव्यतेबद्दल बोलत आहे. या तिसर्या लाटेचा मुलांवर परिणाम होणार याची बर्याच लोकांना माहिती आहे ही बाब लक्षात घेऊन सरकारने गोमेकॉमध्ये नवीन सुपर स्पेशालिटी ब्लॉक सुरू केला आहे. तिसर्या लाटेच्या तयारीसाठी अवलंब केल्या जाणार्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी बैठका घेण्यात आल्याचे सांगितले.