Home Featured सोमवारपासून मडगावातील दुकाने खुली करण्याचा व्यापार्‍यांचा इशारा

सोमवारपासून मडगावातील दुकाने खुली करण्याचा व्यापार्‍यांचा इशारा

0

>> संचारबंदीत परप्रांतियांचा व्यापार सुरू असल्याचा आरोप

संचारबंदीच्या काळात बाजारपेठा बंद करून गोव्यातील कोरोनाबाधितांची संख्या काही कमी झाली नाही वा मृतांच्या संख्येत घट झाली नाही. त्यामुळे ही संचारबंदी पूर्णपणे फसली आहे. मात्र आम्ही आमची दुकाने बंद ठेवून आमचे नुकसान करून घेतले. त्यामुळे सोमवारपासून आम्ही आमची दुकाने खुली करू असा इशारा मडगाव नवा बाजार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी दिला. कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी गोवा सरकारने प्रतिबंधक उपाय म्हणून गोव्यातील बाजार बंद केले.

मडगाव येथील नव्या बाजारासहीत इतर बाजार जरी बंद असले तरी रस्त्यावर, गल्लीत राजरोसपणे मासळी, फळभाज्या, फळे, कपडे व खाद्यपदार्थ विकले जातात. ते खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होते. पण त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे सरकारने जारी केलेल्या संचारबंदीला काहीच अर्थ उरला नव्हता.

रस्त्यारस्त्यावर पदपाथावर विक्री करणारे सर्वजण परप्रांतिय आहेत. त्यांच्यामुळे कोरोनाबाधित वाढण्यात मदत होते. पालिका व पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी यावेळी शिरोडकर यांनी केली.

गोमंतकीय छोट्या व्यापार्‍यांवर उपासमारीची पाळी सरकारमुळे व संचारबंदीमुळे आली आहे. गोव्याबरोबर मडगाव येथील पालिकेच्या इमारत दुकानांचे भाडे, कर माफ करावा, अशी मागणीही यावेळी शिरोडकर यांनी केली. कर्नाटक राज्याप्रमाणे गोव्यातही कडक निर्बंध घालून परवानगी देण्याची मागणी संघटनेने केली.