Home बातम्या वीजपुरवठा दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात

वीजपुरवठा दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात

0

>> मुख्य अभियंते रघुवीर केणी यांची माहिती

तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून वीजपुरवठा खंडीत झालेल्या भागात बुधवारी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे. जर, काही भागातील वीज पुरवठा पूर्ववत होण्याचे शिल्लक राहिल्यास गुरूवारी सकाळपर्यंत सुरळीत होणार आहे, अशी माहिती वीजखात्याचे मुख्य अभियंते रघुवीर केणी यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
बार्देश तालुक्यातील काही भाग, सासष्टी तालुक्यातील किनारी भागातील काही ठिकाणी, पेडणे तालुक्यातील काही भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असेही मुख्य अभियंते केणी यांनी सांगितले.

या चक्रीवादळामुळे वीज खात्याच्या सामानाची सुमारे २२ ते २५ कोटी रुपयांची हानी झाली आहे. सुमारे ४५ किलोमीटर वीज तारांचे नुकसान झाले आहे. १५०० वीज खांबांची पडझड झाली आहे. त्यातील ७०० वीज खांब मोडून पडले आहेत. साकवाळ येथील वेर्णा ते वास्को या भागात वीजपुरवठा करणारा टॉवर कोसळला आहे. तसेच, बाणस्तारी येथील एक फीडरचे मोठे नुकसान झाले आहे अशी माहितीही यावेळी अभियंते केणी यांनी दिली.