>> कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी ५१ टक्के
राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी नवे ४१९५ रुग्ण, आणखी ५६ रुग्णांच्या बळींची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण बळींची संख्या १५५७ एवढी झाली आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३१ हजार ७१६ झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ५१.३४ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत इस्पितळामधून १९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात मागील सात दिवसांपासून मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद होत आहे. काल शुक्रवारी आणखी ५६ कोरोना रुग्णांच्या बळींची नोंद झाली. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये ३२ रुग्ण, दक्षिण गोवा इस्पितळात १६ रुग्ण, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात २ रुग्ण, ईएसआय इस्पितळ, काणकोण आरोग्य केंद्र, लोटली आरोग्य केंद्र, उत्तर आणि दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात प्रत्येकी एका रुग्णाचे निधन झाले. गोमेकॉमध्ये सात रुग्णांना मृतावस्थेत आणण्यात आले, असे अहवालात म्हटले आहे. ५ आणि ६ मे रोजी मृत पावलेल्या रुग्णांचा या अहवालात समावेश करण्यात आला आहे.
नवे उच्चांकी ४१९५ रुग्ण
राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कायम आहे. चोवीस तासांत नवे ४१९५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत नव्या ८१७० स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आला. राज्यात कोविड स्वॅबबाधित होण्याचे प्रमाण ५१.३४ टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख १२ हजार ४६२ एवढी झाली आहे.
२४ तासांत २९६ इस्पितळात
गेल्या चोवीस तासांत नव्या २९६ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून दरदिवशी दोनशेपेक्षा जास्त रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे.
पणजीत २०२३ रुग्ण
मडगावबरोबर राजधानी पणजीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पणजीतील रुग्णसंख्या २०२३ एवढी झाली आहे. कांदोळी, पर्वरी, म्हापसा, फोंडा, कुठ्ठाळी या परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे.
मडगावातील रूग्णसंख्या २३५५ एवढी झाली आहे. कांदोळी भागातील रूग्णसंख्या १५९९, पर्वरी १६१० रुग्ण, म्हापसा येथे १६६३ रुग्ण, फोंडा १५६४ रुग्ण, कुठ्ठाळी १२९९ रुग्ण, कासावली १०६७ रुग्ण, साखळी १५१९ रुग्ण, पेडणे १०५६, शिवोली १०८७ रुग्ण, वास्को येथे १०७१ रुग्ण आहेत.
२१७५ जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाबाधित आणखी २१७५ रुग्ण काल बरे झाले आहेत. बर्या झालेल्या रुग्णांची संख्या ७९ हजार १८९ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.४१ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ३६०६ रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.
गृह विलगीकरणाचा कालावधी १० दिवस
राज्य सरकारने कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनाचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवस ताप येत नसलेल्या कोरोना रुग्णांचा होम आयसोलेशन कालावधी १० दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा आदेश आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा यांनी काल जारी केला. कोरोनाबाधित रुग्णाला १७ दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागत होते. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच, होम आयसोलेशननंतर पुन्हा स्वॅब चाचणीची गरज नाही, असेही आदेशात म्हटले आहे.