रविवारी रुग्णांचा उच्चांक, २२९३ बाधित

0
146

>> चोवीस तासांत २४ जणांचा मृत्यू

>> राज्यातील बळींच्या संख्येने ओलांडला हजाराचा टप्पा

राज्यात नवे कोरोना रुग्ण आणि बळीच्या संख्येत होणारी वाढ कायम आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत आत्तापर्यंतचे सर्वाधिक उच्चांकी नवे २२९३ बाधित रुग्ण आढळून आले असून आणखी २४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोना बळींच्या संख्येने १ हजाराचा टप्पा ओलांडला असून ती १०१७ एवढी झाली आहे. सध्याच्या रुग्णसंख्या १३ हजार ६८९ एवढी झाली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ चिंतेचा विषय बनली आहे. सरकारी यंत्रणेला कोरोना रूग्णवाढ आणि कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण ठेवण्यास अजूनपर्यंत यश मिळाले नाही. मडगाव, कांदोळी, पर्वरी या भागात सध्याच्या कोरोना रुग्णांच्या संख्येने हजारांचा टप्पा पार केला असून पणजी, म्हापसा, चिंबल, साखळी, डिचोली, पेडणे, शिवोली, वास्को, कासावली, कुठ्ठाळी, लोटली, शिरोडा, फोंडा, खोर्ली, नावेली आदी सर्वच भागातील रूग्णसंख्येत वाढ होत आहे.

२४ तासांत १३५ जण इस्पितळात
चोवीस तासांत नव्या १३५ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सरकारी इस्पितळातील खाटा रुग्णांसाठी कमी पडू लागल्या आहेत. इस्पितळ प्रशासनाला रुग्णांना सामावून घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील आठ दिवसांपासून इस्पितळात दाखल होणार्‍या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

मडगाव, कांदोळी, पर्वरीत एक हजारांवर रूग्ण
मडगाव आणि कांदोळीतील रुग्णवाढ कायम असून मडगावातील रूग्णसंख्या १२३६ एवढी झाली आहे. कांदोळी भागातील रूग्णसंख्या १ हजार २०८ झाली आहे. पर्वरीतील रुग्णसंख्या १ हजार १५७ एवढी झाली आहे. वास्को येथे ७११ रुग्ण, म्हापसा येथे ७५३ रुग्ण, पणजी ८८३ रुग्ण, फोंडा ७७२ रुग्ण, कुठ्ठाळी ७७१ रुग्ण, चिंबल ४३२ रुग्ण, शिवोली ४५१ रुग्ण, साखळी ४१७ रुग्ण आहेत. राज्यातील एकूण कोरोना रूग्णसंख्या ७७ हजार ४७७ एवढी झाली आहे.

रविवारी ६५८ जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाबाधित आणखी ६५८ रुग्ण बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ६२ हजार ७७१ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.०२ टक्क्यांवर घसरले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ५४७ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे

स्वॅबच्या चाचणीत वाढ
चोवीस तासांत कोविड स्वॅबच्या चाचणीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ५९४६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ३८.५६ टक्के नमुने बाधित आढळून आले आहेत. राज्यात कोविड स्वॅबचे मोठ्या प्रमाणात नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहे. स्वॅब तपासणीसाठी मोबाईल व्हॅनची मदत घेतली जात असून खासगी प्रयोगशाळेतून स्वॅबची तपासणी करून घेतली जात आहे.

भाटले, सांतईनेज, करंजाळेत
मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर

उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी पणजी परिसरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर भाटले, सांतइनेज, करंजाळे आणि व्हडलेभाट येथे मायक्रो कंटेन्मेंट विभाग जाहीर केले आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी सासष्टी तालुक्यात वाढत्या रूग्णसंख्येमुळे तळावली-नावेली आणि दवर्ली येथे मायक्रो कंटेनमेंट विभाग जाहीर केले आहेत.

२४ जणांचा बळी
राज्यात चोवीस तासांत आणखी २४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाने एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. सात कोरोना रुग्णांचा इस्पितळात दाखल केल्यानंतर चोवीस तासांच्या आत मृत्यू झाला. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये १७ रुग्ण आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बळींमध्ये मुरगाव तालुक्यातील ८ रुग्ण आणि बार्देश तालुक्यातील ६ रुग्णांचा समावेश आहे.
पाळोळे येथील ५२ वर्षीय पुरुष, वास्को येथील ४० वर्षीय पुरुष, मुरगाव येथील ६८ वर्षीय पुरुष, म्हापसा येथील ७८ वर्षीय पुरुष, वास्को येथील ७८ वर्षीय पुरुष, काणकोण येथील ८२ वर्षीय पुरुष, वास्को येथील ५२ वर्षीय पुरुष, खोर्ली येथील ३८ वर्षीय पुरुष, वास्को येथील ३८ वर्षीय पुरुष, म्हापसा येथील २५ वर्षीय युवक, केपे येथील ७८ वर्षीय पुरुष, शिवोली येथील ७३ वर्षीय पुरुष, वास्को येथील ७१ वर्षीय महिला, बार्देश येथील ७५ वर्षीय महिला, मडगाव येथील ५८ वर्षीय महिला, फोंडा येथील ७० वर्षीय महिला, वास्को येथील ८५ वर्षीय पुरुष, पणजी ५६ वर्षीय पुरुष, म्हापसा येथील ५६ वर्षीय पुरुष, फोंडा ७० वर्षीय महिला, डिचोली ५२ वर्षीय पुरुष, दाबोली ६५ वर्षीय पुरुष, सालसेत येथील ५६ वर्षीय महिला आणि बार्देश येथील ९१ वर्षीय महिलेचा बळी गेलेल्यांमध्ये समावेश आहे.

पुतणीच्या हळदी समारंभात
पर्यटनमंत्र्यांचे झिंगाट नृत्य

संपूर्ण गोवा जीवघेण्या कोविडच्या दुसर्‍या लाटेच तडाख्यात सापडलेला असताना काल पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांचे काही लोकांबरोबर नृत्य करीत असतानाचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

एका व्हिडिओत बाबू आजगावकर हे ‘बघतोय रिक्षावाला’ या गाण्यावर तर अन्य एका व्हिडिओत ‘सैराट’ या चित्रपटातील ‘झिंग… झिंग… झिंगाट’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. महिला, पुरूष, युवक व युवती यांच्याबरोबर पर्यटनमंत्री व त्यांचे बंधू राजेंद्र आजगावकर हे नृत्य करत असून व्हिडिओतील सर्वांच्या अंगावर पिवळे कपडे आहेत.

आजगावकर बंधू सोडल्यास कुणाच्याही तोंडावर मास्क नाहीत. मात्र, या घटनेने संतप्त बनलेल्या पर्यटनमंत्र्यांनी आपल्या पुतणीचा शनिवारी हळद समारंभ तर रविवारी विवाह होता.
नृत्याच्या व्हिडिओत ते लोक नृत्य करताना दिसत आहेत ते आपले कुटुंबीय असून त्यात कुटुंबाबाहेरील कुणाचा समावेश नाही. त्यामुळे कुणीही विनाकारण ह्या व्हिडिओचा बाऊ करू नये, अशी प्रतिक्रिया दै. नवप्रभाशी बोलताना दिली.
या सोहळ्याला वधू व यांचे कुटुंबीय व नातेवाईक मिळून फक्त १०० लोक उपस्थित होते, अशी माहिती आजगावकर यांनी दिली.