अमेरिका, जपान, ब्रिटनच्या लशींना भारतात मान्यता

0
174

लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी रशियाच्या स्पुतनिक लशीला मान्यता दिल्यानंतर आता अमेरिका, जपान आणि ब्रिटनमधूनही लस आयात केली जाणार आहे. कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड’ या स्वदेशी लशींनंतर ‘स्पुतनिक व्ही’ या पहिल्या परदेशी लशीला सोमवारी भारतात मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता इतर परदेशी लशींचीही भारतात आयात केली जाणार आहे.

काल मंगळवारी झालेल्या नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड १९ या तज्ज्ञांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तज्ज्ञांच्या समितीचा हा प्रस्ताव भारत सरकारकडूनही मान्य करण्यात आला आहे.
परदेशातून आयात केल्या जाणार्‍या लशींचा वापर अगोदर केवळ १०० लोकांवर केला जाईल तसेच पुढचे ७ दिवस त्यांच्यावर तज्ज्ञांचे लक्ष राहील. त्यानंतर या लशींच्या वापरास सुरूवात केली जाईल.

देशभरात मंगळवारी
१.६१ लाख बाधित

दरम्यान, भारतात गेल्या चोवीस तासांत १ लाख ६१ हजार ७३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सोमवारी ९७ हजार १६८ रुग्णांना रुग्णालयांतून सुट्टी देण्यात आली तर याच २४ तासांत ८७९ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ एवढी झाली असून आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७१ हजार ०५८ नागरिकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात १२ लाख ६४ हजार ६९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.