>> फकरचे शानदार शतक, बाबर व इमामची अर्धशतके
फकर झमानचे शानदार शतक आणि कर्णधार बाबर आझम (९४) व इमाम-उल-हक (५७) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर पाकिस्तानने तिसर्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला २८ धावांनी पराभूत करीत ४ लढतींच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
पाकिस्तानकडून मिळालेल्या ३२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ४९.३ षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात २९२ धावांपर्यंत मजल मारू शकला. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ठरावित अंतराने बाद होत गेले. १४० धावांपर्यंत त्यांचे ५ फलंदाज तंबूत परतले होते.
जानेमन मलान आणि एडन मारक्रम यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मारक्रम १८ धावा जोडून परतला. ७० धावांची अर्धशतकी खेळी केलेला जानेमन मलान पायचित होऊन परतला.
जेजे स्मटस् (१७), कर्णधार तेंबा बउमा (२०) आणि हेन्रिच क्लासेन (४) हे जास्त वेळ खेळपट्टीवर स्थिराऊ शकले नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकन संघ बॅकफूटवर गेला. परंतु त्यानंतर कायल वेरेयीन (६२) आणि अँडिले फेख्लुुक्वायो (५४) यांनी सहाव्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी करीत आफ्रिकेच्या विजयाच्या आशा वाढवल्या. परंतु पाकिस्तानी गोलंदाजांनी त्यानंतर आपले वर्चस्व राखत आफ्रिकेचा डाव २९२ धावांवर संपवित मालिकेत २-१ अशी आघाडी मिळविली. शाहीन शाह आफ्रिदी व मोहम्:द नवाझ यांनी प्रत्येकी ३, हॅरिस रौफने २ तर हसन अली व उस्मान कादीर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने फखर झमान व कर्णधार बाबर आझम यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ७ गडी गमावत ३२० अशी धावसंख्या उभारली होती. ९ चौकार व ३ षटकारांच्या सहाय्याने १०४ चेंडूंत १०१ धावांची शतकी खेळी केलेल्या फखर झमानने इमाम उल हकच्या (५७) साथीत ११२ धावांची सलामी दिली. त्यानंतर कर्णधार बाबर आझमसमवेत दुसर्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण ९४ धावा जोडल्या. बाबरचे शतक थोडक्यात ६ धावांनी हुकले. ७ चौकार व ३ षटकारांसह ८२ चेंडूंत ९४ धावा करून तो पेख्लुक्वायोच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. हसन अलीने ३२ धावा जोडल्या. दक्षिण आफ्रिकेकडून फिरकीपटू केशव महाराजने ३, एडेन मारक्रमने २ तर अँडिले फेख्लुक्वाओ व जेजे स्मटस् यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.