वेलिंग – पाटो येथे मुख्य रस्त्यावर काल मंगळवारी संध्याकाळी ट्रॉलीची कारला ठोकर बसल्याने विश्वनाथ सगुण नाईक (७०) यांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघातात दामू नाईक व शशिकांत नाईक हे विश्वनाथ यांचे पुत्र गंभीर जखमी झाले. ते ढवळी येथील रहिवासी आहेत. त्यांच्यासह ट्रॉलीचा चालक अमित उपाध्याय (२७) हा जखमी झाला असून तिघांनाही गोमेकॉत दाखल केले आहे.
एमएच ४३ बीजी ९७०३ ही ट्रॉली फोंड्याहून पणजीच्या दिशेने जात होती तर जीए ०१ आर २१९३ ही कार पणजीहून फोंड्याच्या दिशेने येत होती. ट्रॉलीचालकाचा वाहनावरील ताबा गेला व ट्रॉली चुकीच्या मार्गाने दुसर्या रस्त्यात घुसली. त्याचवेळी कार तेथून येत असताना ही ट्रॉली कारला धडकल्याने कारमधील विश्वनाथ नाईक यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली व त्यांचे जागीच निधन झाले. जखमी दोन्ही भावांपैकी दामू नाईक यांच्या डोक्याला इजा झाल्याने ते गंभीर आहेत.
अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन मदतकार्य केले. फोंडा पोलीस व अग्निशामक दलही घटनास्थळी दाखल झाले. अवजड क्रेनने कार व ट्रॉली बाजूला केली. फोंडा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत पाठवला.
ढवळी येथील विश्वनाथ नाईक हे आजारी असल्याने त्यांना गोमेकॉत दाखल केले होते. काल मंगळवारी त्यांना त्यांना गोमेकॉतून घरी आणण्यात येत होते.