>> निवडून आलेल्या १०५ पैकी ८५ नगरसेवक भाजपचे
>> बंडखोरांवर कारवाई होईल – तानावडे
राज्यातील भाजप सरकारच्या नेतृत्वावर आपला विश्वास आहे हे जिल्हा पंचायत निवडणुकांनंतर आता पणजी महापालिका व सहा नगरपालिकांच्या निवडणुकांतूनही गोव्यातील जनतेने दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, मंत्री विश्वजित राणे, नीलेश काब्राल, पणजीचे आमदार बाबुश मोन्सेर्रात व प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासमवेत काल येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पालिका निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले.
भाजप ही बळकट संघटना असलेला पक्ष आहे, असे सांगून पक्षाला पाच नगरपालिका व एका महापालिकेवर जो विजय मिळाला आहे तो पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा विजय असल्याचे सावंत म्हणाले. एका प्रश्नाचे उत्तर देताना, आम्ही कुठल्याही विजयाकडे उपउपांत्य किंवा उपांत्य फेरी म्हणून पाहत नसल्याचे ते म्हणाले.
रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण, तमनार वीज प्रकल्प तसेच जंगलतोड करावी लागणार असल्याने वादग्रस्त ठरलेला महामार्ग या तीन वादग्रस्त प्रकल्पांसह अन्य काही विकास प्रकल्पांना लोकांचा विरोध असतानाही दरवेळी भाजपचाच विजय होतो आहे याचा अर्थ या प्रकल्पांना असलेला लोकांचा विरोध मावळला आहे असा घ्यायचा का, असे मुख्यमंत्र्याना विचारले असता या प्रकल्पांना विरोध करणारे लोक हे बिगरसरकारी संघटनाचे लोक असल्याचे व जनतेचा त्यांना पाठिंबा नसल्याचा दावा सावंत यांनी यावेळी केला.
प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, पक्षाला ‘न भूतो’ असे यश मिळालेले असून जिंकलेल्या १०५ नगरसेवकांपैकी ८५ नगरसेवक हे भाजपचे असल्याचा दावा त्यांनी केला. कुंकळ्ळी नगरपालिकेतील पराभवाची जबाबदारी प्रदेश अध्यक्षश्र या नात्याने आपण स्वीकारत असल्याचे ते म्हणाले.