प्रत्येक समाजाने आत्मपरीक्षण करावे

0
259

खांडेकरांचा पत्रसंवाद

  • राम देशपांडे

भाऊंना सतत अनेक सभा, संमेलने, परिषदा, शाळा-महाविद्यालयांची स्नेहसंमेलने, चर्चासत्रे, परिसंवादाची निमंत्रणे यायची. कधी समारंभाचे प्रमुख उद्घाटक, तर कधी अध्यक्ष या नात्यानेही अशी निमंत्रणे यायची. मात्र तब्येतीच्या काही ना काही तक्रारी असल्यामुळे त्यांना जाणे अशक्य व्हायचे. असे असूनही भाऊ त्याना सविस्तर पत्र पाठवून शुभेच्छा द्यायचे.

एकदा असेच एक निमंत्रण भाऊंना आले. ते निमंत्रण होते महाराष्ट्र मध्यमवर्ग परिषदेच्या अधिवेशनाचे. प्रकृती बरी नसल्याने त्यांनी या परिषदेच्या पदाधिकार्‍यांना पत्र पाठवून कळविले की-
अधिवेशनात मध्यमवर्गाच्या सर्व अडीअडचणींचा विचार होईलच. मात्र मध्यमवर्गाची परंपरागत व्याख्या मान्य करून तो होऊ नये. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशातल्या मध्यमवर्गाच्या कक्षा झपाट्याने रुंदावत आहेत. सांस्कृतिक पार्श्‍वभूमी नसलेला एक नवा मध्यमवर्ग औद्योगिक संस्कृतीत निर्माण होत असतो. तो आपल्याकडेही हळूहळू मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. केवळ आर्थिकदृष्टीनंच कोणत्याही वर्गाच्या दुःखाचा विचार करणं आजच्या काळात इष्ट होणार नाही. एक तर परंपरागत वर्गाची सरमिसळ त्वरेनं होणार आहे. या परिवर्तनाचा प्रारंभ आपल्या देशात झाला आहे. शिवाय आर्थिक विचार नैतिक किंवा सांस्कृतिक विचारांपासून पूर्णपणे अलग करून कोणत्याही वर्गाची फारशी मोठी सुधारणा होणार नाही. आपल्यावर होणार्‍या अन्यायाची दाद मागण्याची जरूरी आज सर्वांनाच भासत आहे. पण ही दाद मागत असताना प्रत्येक समाजाने वा समाजाच्या विभागाने कठोर आत्मपरीक्षण करायला शिकलं पाहिजे. आपल्या सर्व सुख-दुःखांचा विचार संपूर्ण समाजाच्या संदर्भात करायला हवा, असं माझ्या अल्पमतीला वाटतं. अधिवेशनात सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार होऊन, जुन्या-नव्या मध्यमवर्गाला विधायक असे मार्गदर्शन होईल अशी अपेक्षा आहे.

  • वि. स. खांडेकर
    ५ डिसेंबर १९७०