भारतात आता ह्या वर्षातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले असून महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश ह्या राज्यांत ८३.१४ टक्के नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात काल ४३८४६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर चोवीस तासांत १९७ जण मृत्युमुखी पडले. महाराष्ट्रात काल एका दिवसात सत्तावीस हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असून त्या खालोखाल पंजाब व केरळचा क्रमांक लागतो. कर्नाटकमध्येही दिवसा सरासरी दीड हजारावर नवे रुग्ण आढळून येत आहेत.
दरम्यान देशात आजवर साडेचार कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. कोरोना लशीचे सहा कोटी डोस जगभरातील ७६ देशांना भारताने पुरविले असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशात सध्या तीन लाख नऊ हजार कोरोना रुग्ण आहेत. कोरोना महामारी आता संपल्याच्या भ्रमात लोक असल्यानेच ही संख्या वाढू लागली असल्याचे मत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मांडले आहे. भारतात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ब्राझील, सौदी अरेबिया आणि मोरोक्को ह्या देशांचा कोरोना लशीचा पुढील पुरवठा रोखला आहे. भारताने आजवर ऐंशी लाख डोस अन्य देशांना देणगीदाखल दिले असून ५२ दशलक्ष डोसची विक्री केली आहे.