आनंदयात्री

0
121

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे बा. भ. बोरकर


पद्मभूषण लक्ष्मण पै गेले. सदैव उमद्या, उजळ रंगांच्या संगतीत रमलेला हा अवलिया चित्रकार ‘कीप स्माईलिंग – हसत राहा’ असा संदेश जगाला देत मृत्यूला दोन्ही बाहू पसरून शांतपणे आणि हसत हसत सामोरा गेला. केवळ आपला जीवनकाल वाढविण्यासाठी म्हणून कोणत्याही कृत्रिम वैद्यकीय साधनांचा वापर केला जाऊ नये असे त्यांनी आपल्या कुटुंबीयांना निक्षून बजावले होते. काही दिवसांपूर्वीच कोरोनावरील लस घेऊन इतरांनाही प्रेरित करणार्‍या पै यांच्या दाराशी मृत्यू घोटाळत असल्याचे दिसल्याने त्यांना इस्पितळात भरती होण्याची विनंती करणार्‍या डॉक्टरांना स्पष्ट नकार देऊन ‘मला जायचे आहे’ असे सांगत पै गेले. हा झुंजार माणूस केवळ चित्रकार नव्हता; जात्याच लढवय्या होता. पोर्तुगिजांच्या अन्यायी राजवटीविरुद्ध त्यांनी धाडसी संघर्ष जसा केला, त्यासाठी तीनवेळा तुरुंगवास जसा पत्करला, तसेच जे.जे. मध्ये अध्यापन करीत असताना प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टस् ग्रुपमध्ये वावरल्याने नोकरी गमावण्याची वेळ आली, तेव्हा त्याविरुद्धही ताठ कण्याने ते लढले. स्वाभिमानी जगण्याचे हे वाण त्यांच्या अखेरपर्यंत हाती होते.
चित्रकलेबरोबरच लक्ष्मण पैंना संगीतकलेमध्येही रस होता. ते स्वतः सतार आणि बासरी उत्तम वाजवायचे. रागदारी संगीत ऐकत ऐकत त्यावरील चित्रमालिकाही त्यांनी केल्या आहेत. संगीत, चित्र, नृत्य आदी कला एकमेकांच्या साथीने अधिक बहरतात अशी त्यांची भावना होती. त्यामुळे जेव्हा सत्तरच्या दशकात ते गोवा कला महाविद्यालयाचे द्वितीय प्राचार्य म्हणून गोव्यात आले, तेव्हा तोवर निर्वासितासारखे वावरत आलेल्या गोवा कला महाविद्यालयाला मांडवीच्या काठी कला अकादमी संकुलात स्थायी जागा मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सर्व कला एकमेकांच्या सान्निध्यात तेथे बहराव्यात असे त्यांचे स्वप्न होते, परंतु त्यांना आल्तिनोवर जागा देण्यात आली. तिथे वास्तुविशारद सार्टो आल्मेदांच्या साथीने त्यांनी त्या महाविद्यालयाची इमारत आपल्या कल्पनेनुसार उभारली. त्या इमारतीत बंदिस्तपणा नसावा, मोकळेपणा असावा. नव्या – जुन्या मुलांना एकमेकांचे काम मोकळेपणाने पाहता यावे, असा त्यांचा आग्रह होता. त्यातून त्यांच्या स्वप्नाळू दृष्टीचेच दर्शन घडते.
जीवन हा उत्सव आहे असे मानणारा आणि आपल्याला गवसलेल्या रंगांच्या उधळणीतून ह्या उत्सवातील जीवनरसाची नाना रूपे जगाला दाखवणारा हा थोर चित्रकार सदैव आपल्या प्रिय गोव्याशी जोडलेला राहिला होता हा त्यांचा महत्त्वाचा विशेष होता. खरे तर लक्ष्मण पै तोवर केवळ गोव्याचे उरले नव्हते. त्यांच्या कलेची कीर्ती केव्हाच वैश्विक पातळीवर पोहोचली होती. परंतु पॅरिसपासून न्यूयॉर्कपर्यंत आणि लंडनपासून बर्लीनपर्यंत सर्वत्र आपल्या कलाविष्काराच्या नाममुद्रा उमटवित असतानाही त्यात आपली गोमंतकीय पाळेमुळे हरवली जाणार नाहीत याची काळजी त्यांनी सदैव घेतली. आपल्या चित्रकृतींमधून आपल्या गोमंतकीयत्वाचा, इथल्या जनजीवनाचा, संस्कृतीचा, संगीतापासून निसर्गापर्यंतच्या संस्कारांचा देखणा आविष्कार ते घडवीत राहिले. इथल्या शिगम्यापासून फेणीपर्यंत गोमंतकीयत्वाच्या खाणाखुणा आपल्या चित्रकृतींमध्ये उतरवून ते आपले गोमंतकीयत्व अभिमानाने मिरवीत राहिले, वैश्विक पातळीवर नेत राहिले. आपल्या कलेचा डंका जगभरात वाजत असूनही आयुष्याच्या सांध्यपर्वात ते शाहिस्ता थापर यांच्यामुळे आपल्या प्रिय गोव्यातच परतले होते आणि शेवटपर्यंत त्या रंगांमध्ये रंगलेलेच होते.
नैराश्याची सया पसरविणार्‍या काळवंडलेल्या रंगांचा त्यांना तिटकारा होता. त्यामुळे एखाद्या आनंदयात्रिकासारखे ते आपल्या चित्रांतून निळा, पिवळा, शुभ्रधवल अशा उजळ, तेजस्वी रंगांचीच उधळण करीत राहिले हा त्यांच्या चित्रांचा ठळकपणे नजरेत भरणारा विशेष आहे. पै यांची चित्रे आपल्यावर सदैव प्रसन्नतेचा शिडकावा करतात. रंग आणि भावभावनांच्या निकटनात्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. निळ्याच्या शेजारी पिवळा आला तर त्यातून घडणार्‍या रंगसंगतीचा मनावर घडणारा प्रभाव आणि निळ्याशेजारी लाल आला तर त्यातून घडणारा प्रभाव वेगवेगळा कसा असतो आणि त्यातून चित्रांचे परिमाण आणि परिणाम कसे बदलतात त्याविषयी ते सांगत असत. आपल्या चित्रांना शीर्षके देण्याचेही ते उत्तरपर्वात टाळू लागले होते. रसिकांनी दिलखुलासपणे आपल्या चित्राचा आस्वाद घ्यावा आणि आपल्याला हवा तो अर्थ लावावा असे त्यांना वाटे. रसिकाचा चित्रांशी असा संवाद झाला पाहिजे ही त्यांची धारणा होती. आता ते आपल्यात नाहीत. त्यांची चित्रे मागे उरली आहेत. ती येणार्‍या पिढ्यांशी संवाद साधतील. त्यांना काळाच्या ओघात हरवत चाललेल्या, भ्रष्ट होत चाललेल्या निज गोमंतकीयत्वाचेही दर्शन घडवतील. यापुढील काळात ते सांभाळण्याचीही नक्कीच हाक घालतील..!