सी.ए.भवानी देवी हिने आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. भारताच्या इतिहासातील ती मानाच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा देशातील पहिलीवहिली तलवारपटू (फेन्सिंग) ठरली आहे. सध्या सुरू असलेल्या फेन्सिंग विश्वचषक स्पर्धेतील काही महत्त्वाच्या घडामोडींमुळे भवानी देवीला ऑलिम्पिकचे तिकिट लाभले आहे. या स्पर्धेत यजमान हंगेरीचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. त्यामुळे कोरियाने उपांत्य फेरीत स्थान प्राप्त केले. भवानी देवीने ऍडजस्टेड ऑफिशियल रँकिंग (एओआर) पद्धतीमुळे पात्रता मिळविली. जागतिक क्रमवारीनुसार आशिया ओशियाना विभागासाठी दोन वैयक्तिक ऑलिम्पिक जागा होत्या. ५ एप्रिल २०२१ ही अंतिम तारीख यासाठी होती.
जागतिक क्रमवारीत ४५व्या स्थानावरील भवानीने या दोनपैकी एक जागा आपल्या नावे निश्चित केली. पुढील महिन्यात क्रमवारी जाहीर झाल्यानंतर अधिकृतरित्या २७ वर्षीय भवानीचे नाव जाहीर केले जाणार आहे. कोरोनामुळे संपूर्ण क्रीडा जगत थांबण्यापूर्वी भवानीने चेन्नई, थलासरी व इटलीतील लिवोर्नो येथे प्रशिक्षक निकोला झानोटी यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मेहनत घेतली होती.
२०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्यात अपयश आल्यानंतर तिने तलवारबाजी सोडण्याचा देखील निर्णय घेतला होता. परंतु, तिचे मन वळवण्यात सहकार्यांना यश आले होते.