मिताली बनली ‘दहा हजारी’

0
166

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी जगातील केवळ दुसरी महिला खेळाडू होण्याचा मान मिताली राज हिने मिळविला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात आपल्या ३६ धावांच्या खेळी दरम्यान तिने दहा हजार धावा पूर्ण केल्या. इंग्लंडची शार्लट एडवर्डस् (१०,२७३) ही ‘दहा हजारी’ होणारी पहिली महिला खेळाडू ठरली होती. सध्या सक्रिय असलेल्या खेळाडूंमध्ये मितालीनंतर न्यूझीलंडच्या सुझी बेट्‌स (७८४९), वेस्ट इंडीजची स्टेफानी टेलर (७८१६) व ऑस्ट्रेलियाच्या मेग लेनिंग (६९००) यांचा क्रमांक लागतो. १९९९ साली लखनौ येथे इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या मितालीने १० कसोटीत ५१च्या सरासरीने ६६३, २१२ वनडेंत ५०.५३च्या सरासरीने ६९७४ व ८९ टी-ट्वेंटींमध्ये ३७.५२च्या सरासरीने २३६४ धावा केल्या आहेत.

भारतीय महिलांचा पराभव
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिलांना काल शुक्रवारी डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ६ धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ बाद २४८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाहुण्यांनी ४६.३ षटकांत ४ बाद २२३ धावा केल्या. पावसामुळे पुढे खेळ होऊ न शकल्याने डकवर्थ लुईसच्या आधारे विजेता ठरवण्यात आला.

प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताकडून पूनम राऊतने सर्वाधिक ७७ धावा केल्या. मिताली राज, हरमनप्रीत व दीप्ती शर्माने प्रत्येकी ३६ धावांचे योगदान दिले. जेमिमा पुन्हा एकदा अपयशी ठरली. तिला भोपळादेखील फोडता आला नाही. द. आफ्रिकेकडून इस्माइलने सर्वाधिक २ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाहुण्यांकडून सलामीवीर लिझेल ली हिने शानदार नाबाद शतक लगावताना १३१ चेंडूंत १६ चौकार व २ षटकारांसह नाबाद १३१ धावा केल्या. भारताकडून झुलननने २ तर राजेश्‍वरी व दीप्तीने प्रत्येकी १ गडी बाद केला. या विजयासह पाहुण्यांनी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा सामना १४ रोजी खेळविला जाणार आहे.