>> मजुरांनी खून केल्याचे स्पष्ट
>> संशयितांना मुंबईत अटक
>> २४ तासांच्या आत कारवाई
चंद्रावाडा अंबाजी – फातोर्डा येथील सासू व जावयाच्या दुहेरी खूनप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित मजुरांना दादर मुंबई येथून ताब्यात घेतले. सदर मजुरांनी खुनाची कबुली दिली आहे. घटना घडल्यानंतर चोवीस तासांच्या आत संशयितांच्या मुसक्या आवळल्या. अटक केलेल्या संशयित मजुरांपैकी दोघेजण झारखंड येथील तर एकजण बिहारमधील आहे.
माय वालंकिणी या बंगल्यात रहात असलेल्या मिंगेल मिरांडा (६५) व त्यांची सासू कॅटरिना पिंटो (८५) यांचा त्यांच्या घरालगत मिरांडा यांच्यात भाड्याच्या खोलीत राहणार्या तीन मजुरांनी दि. ८ मार्च रोजी मध्यरात्री तीक्ष्ण हत्याराने खून केल्याचे उघड झाले. खुन्यांनी दोघांच्याही डोक्यावर हातोड्याने प्रहार केला व नंतर सुर्याने सर्वांग भोसकले. त्यानंतर त्यांचे मृतदेह कपड्यात गुंडाळून स्वयंपाकघरात ठेवले होते. मुलगा व्हॅलिंतिनो याने पोलिसांत याबाबतची खबर दिल्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली. शेजारी भाड्याने रहात असलेले मजूर तेथून बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात होता. संशयितांनी पळून जाण्यासाठी वापरलेली मिरांडा यांची दुचाकी वास्को येथे रेल्वे स्थानकाजवळ सापडली.
त्यामुळे खुनानंतर मजुरांनी दुचाकीवरून पळ काढून ते वास्को येथून सकाळीच आपल्या गावी रेल्वेने गेले असावेत असा तर्क पोलिसांनी केला. त्यानुसार काल मंगळवारी सकाळी पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरील एका उद्यानातून ताब्यात घेतले.
हे मजुर रहात असलेल्या खोलीतून एक हातोडा व सुरा हस्तगत केला. हॉस्पिसियू इस्पितळात काल शवचिकित्सा केली असता हातोड्याने डोक्यावर प्रहार केल्याने व अंगावर सुर्याने भोसकल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार यांनी मुंबई येथे तिन्ही संशयितांना पकडल्याची माहिती दिली. गोवा पोलीस त तिन्ही संशयितांना घेऊन गोव्यात येण्यास निघाले असून ते बुधवारी सकाळी गोव्यात पोहोचतील. हा खून सोने, दागिने व पैशांसाठी झाला की अन्य कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दोघे झारखंडचे तर
तर एकजण बिहारी
दरम्यान, फातोर्डा खूनप्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची माहिती मिळाली असून यातील दोघेजण झारखंड येथील व एकजण बिहार येथील आहे. रविनकुमार श्यामकुमार सादा (१८) हा बिहारमधील असून आकाश अजयकुमार घोष (२०) व आदित्यकुमार रमेश खरवाल (१८) हे दोघे झारखंडमधील आहेत. त्यांना मुंबई दादर येथून ताब्यात घेण्यात आले.