पाहुण्या इंग्लंडचा ११२ धावांत खुदा

0
192

>> टीम इंडिया ३ बाद ९९

>> अक्षर पटेलचे ६ बळी

>> रोहितचे नाबाद अर्धशतक

गुलाबी चेंडूने दिवस-रात्र पद्धतीने कालपासून सुरू झालेल्या भारत व इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताने गाजवला. नाणेफेक जरी इंग्लंडने जिंकली असली तरी अक्षर पटेलने ३८ धावांत ६ बळी घेत पाहुण्यांचा ११२ धावांत खुर्दा उडवत भारताला वर्चस्व प्रस्थापित करून दिली. दिवसअखेर भारताने ३ गडी गमावून ९९ धावा केल्या आहेत.

इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी इंग्लंडचा संघ पहिल्या कसोटीप्रमाणेच मोठी धावसंख्या उभारून भारतावर दबाव टाकेल असा अंदाज बांधण्यात आला होता. परंतु, मोटेराच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टीने पहिल्याच दिवशी आपला फिरकी रंग दाखवला. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणे अपेक्षित होते. परंतु, मुंबईहून खास मागवण्यात आलेल्या मातीने बनवलेल्या खेळपट्टीने पाहुण्यांना संकटात टाकले. आपला शतकी कसोटी सामना खेळणार्‍या इशांतने सलामीवीर डॉम सिबली याला खातेही खोलू न देता तंबूची वाट दाखवली. यानंतर इंग्लंडचे गडी ठराविक अंतराने बाद होत राहिले. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रॉवली याने चिवट प्रतिकार करताना आपले चौथे कसोटी अर्धशतक लगावत सर्वाधिक ५३ धावांची खेळी साकारली. केवळ आपली दुसरी कसोटी खेळत असलेल्या अक्षर पटेलने दुसर्‍यांदा डावात पाच बळी घेण्याचा कारनामा करताना ६ बळी घेतले. चारशे बळींच्या उंबरठ्यावर असलेल्या अश्‍विनने ३ बळी घेत त्याला तोलामोलाची साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना गिल व रोहित यांनी भारताला ३३ धावांची सलामी दिली. गिलला बाद करत आर्चरने इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. लिचने पुजाराला भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे भारतीय संघ २ बाद ३४ अशा संकटात सापडला. दिवसाचा खेळ संपण्यास अवघे काही चेंडू शिल्लक असताना विराट बाद झाला. दिवसअखेर रोहित ५७ व रहाणे १ धाव करून नाबाद होते. रोहितने १२व्या वेळेस कसोटीत अर्धशतक लगावत फलंदाजीस कठीण होत चालेलल्या खेळपट्टीवर आपली उपयुक्तता सिद्ध केली.
इंग्लंडने या सामन्यासाठी संघात तब्बल चार बदल केले. ओली स्टोन, रॉरी बर्न्स, मोईन अली व डॅन लॉरेन्स यांच्या जागी इंग्लंडने जोफ्रा आर्चर, झॅक क्रॉवली, जेम्स अँडरसन व जॉनी बॅअरस्टोव यांचा संघात समावेश केला. दुसरीकडे भारताने मोहम्मद सिराज व कुलदीप यादव यांना वगळून जसप्रीत बुमराह व वॉशिंग्टन सुंदर यांना संघात घेतले.

धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः झॅक क्रॉवली पायचीत गो. पटेल ५३, डॉम सिबली झे. रोहित गो. इशांत ०, जॉनी बॅअरस्टोव पायचीत गो. पटेल ०, ज्यो रुट पायचीत गो. अश्‍विन १७, बेन स्टोक्स पायचीत गो. पटेल ६, ओली पोप त्रि. गो. अश्‍विन १, बेन फोक्स त्रि. गो. पटेल १२, जोफ्रा आर्चर त्रि. गो. पटेल ११, जॅक लिच झे. पुजारा गो. अश्‍विन ३, स्टुअर्ट ब्रॉड झे. बुमराह गो. पटेल ३, जेम्स अँडरसन नाबाद ०, अवांतर ६, एकूण ४८.४ षटकांत सर्वबाद ११२
गोलंदाजी ः इशांत शर्मा ५-१-२६-१, जसप्रीत बुमराह ६-३-१९-०, अक्षर पटेल २१.४-६-३८-६, रविचंद्रन अश्‍विन १६-६-२६-३
भारत पहिला डाव ः रोहित शर्मा नाबाद ५७, शुभमन गिल झे. क्रॉवली गो. आर्चर ११, चेतेश्‍वर पुजारा पायचीत गो. लिच ०, विराट कोहली त्रि. गो. लिच २७, अजिंक्य रहाणे नाबाद १, अवांतर ३, एकूण ३३ षटकांत ३ बाद ९९
गोलंदाजी ः जेम्स अँडरसन ९-६-११-०, स्टुअर्ट ब्रॉड ६-१-१६-०, जोफ्रा आर्चर ५-२-२४-१, जॅक लिच १०-१-२७-२, बेन स्टोक्स ३-०-१९-०