चीनने अजूनही काही ठिकाणांहून माघार घेण्याचा भारताचा आग्रह

0
85

>> चीनबरोबर चर्चेची दहावी फेरी सुरू

भारत व चीन यांच्यातलष्करी पातळीवरील दहाव्या फेरीची चर्चा सुरू झाली असून यात हॉट स्प्रिंग्ज, गोग्रा, देपसांग, या पूर्व लडाख भागातून माघार घ्यावी असा आग्राह भारताने धरला आहे. दहाव्या कोअर कमांडर पातळीवरील चर्चा ही भारत व चीन यांच्या लष्करादरम्यान पँगॉंग सरोवराच्या उत्तर व दक्षिण बाजूकडील सैन्य माघारीनंतर घेण्यात आली. त्यात सैन्य माघारीबरोबरच शस्त्रसामग्री व तंबूही काढण्यात आले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी असे सांगितले होते, की पँगॉग सरोवरानजीकचे सैन्य माघारी घेतल्यानंतर ४८ तासांत चर्चेची पुढची फेरी घेतली जाईल. त्याप्रमाणे ही चर्चा घेण्यात आली. चर्चेची दहावी फेरी सकाळी शनिवारी दहा वाजता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हद्दीतील मोल्दो येथे सुरू झाली. हॉट स्प्रिंग, गोग्रा व देपसांग भागातून लवकर माघारीचा भारताचा आग्रह असून त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव निवळण्यास मदत होणार आहे. चर्चेचा भर हा सैन्य माघारीवरच आहे. शनिवारी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लेह विभागातील १४ व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी केले तर चीनच्या बाजूने दक्षिण शिनजियांग लष्करी जिल्ह्यातील पीपल्स लिबरेशन आर्मीचे कमांडर मेजर जनरल लिउ लिन यांनी नेतृत्व केले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत जाहीर केल्याप्रमाणे पँगॉंग सरोवराच्या उत्तर किनार्‍यावरील फिंगर आठ भागापर्यंत चिनी सैन्य माघारी जाणे अपेक्षित आहे. भारतीय सैन्य धनसिंह थापा छावणीजवळील फिंगर ३ पर्यंत असणे अपेक्षित आहे.