- अंजली आमोणकर
डुप्लीकेट चावीने बाहेरचे दार उघडून सर्वजण आत यायला व अंधारातल्या चोरांनी व्हरांड्यात शिरायला एकच गाठ पडली. ‘‘अरे, दिवे कोणी घालवले…’’ म्हणत बाबांनी मेन्सचं बटन चालू केलं आणि तिकडं व्हरांड्यात कुत्र्यांचं भुंकणं व आरोळ्यांनी घर दणाणून गेलं.
आजोबा येरझारा घालून थकले. मंजिरीनं आता टॉयलेटच्या दारावर टक्टक् करण्याऐवजी चांगलं जोरजोरात ठोठावलं. आत रंगात आलेलं गाणं गचकन थांबलं व एका मिनिटात कडी काढली गेली. मंजिरीनं खाड्कन दार उघडलं व निनादच्या बखोटीला धरून बाहेर ओढलं. त्याला बाजूला घेत आजोबांना म्हणाली, ‘‘हं, जा!’’ आजोबा आत जातानाच आजीनं पटकन निनादचं बखोटं मंजिरीच्या हातून सोडवलं व आता बसणार दणका या भीतीनं त्याला पटकन बाजूला घेतलं. ‘‘घाईच्या वेळेला कसली रे गाणी गात बसतोस आत? असं करू नये म्हणून आई सांगत असते ना नेहमी? मग?’’ आधीच पोटभर न गाता आल्याने व या ओढाताण व हिसका-फिसकीने निनाद नाराज झाला होता. तो मोठ्याने आरडाओरडा करणारच होता, पण आईने वटारलेले डोळे, दुमडलेला ओठ व कोणत्याही क्षणी सणसणीत धपाटा देण्याकरिता उगारलेला हात बघून तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला, ‘‘नेहमी नेहमी रागावतात मला. घरात कुठेही गाणं म्हणू देत नाहीत. कोणाला ना कोणाला त्रास होतोच त्याचा. गाण्याच्या क्लासलाही घालत नाहीत. मला माझ्या कम्फर्ट झोनमध्ये तरी गाऊ द्या.’’
‘‘काऽऽय? कम्फर्ट झोन? ईऽऽ शीऽऽऽ हात् मेल्या, हा… हा… हा…’’ असा निरनिराळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव आई, ताई, दादा, आजी या सर्वांनी निनादवर एकाचवेळी केला. निनाद मख्खच राहिला. उलट सगळे फिदीफिदी हसत असतानाच तो विचार करू लागला- ताई कानाशी रेडिओ धरून गाणी ऐकत असते आणि आई हाका मारते तेव्हा दादा कसा सांगतो, ‘आई, तुझा आवाज ऐकणार नाही ती, ती तिच्या कम्फर्ट-झोनमध्ये आहे…’
आजी संध्याकाळी देवळात जाताना हसत हसत आजोबांना म्हणते- ‘‘चालले हो मी माझ्या कम्फर्ट-झोनमध्ये प्रवचनाला. तुम्ही बसा घरात रिकामटेकड्यांना गोळा करून पत्ते कुटत…’’ मग आजोबासुद्धा तावातावाने म्हणतात- ‘‘का? का…? पत्ते कुटणं, त्याबरोबर मित्रांशी हसत-खिदळत गप्पा मारणं, एकमेकांची टर उडवत काहीतरी हादडत राहाणं- हा मला रिलॅक्स करणारा, सुखाचा भूपट्टा आहे…. मग?’’ ‘‘ऑ?’’ ‘‘तेच गं, कम्फर्ट-झोन…’’ मान उडवून आजी तरातरा निघून जाते. बाबांचा कम्फर्ट-झोन म्हणजे लायब्ररी, आईचा कम्फर्ट-झोन म्हणजे महिला मंडळ. मग मला जिथे निवांत गावंसं वाटतं, तो माझा कम्फर्ट-झोन असेल तर काय बिघडलं?
संध्याकाळी सगळे सिनेमाला गेले. निनाद सोसायटीतल्या मित्राच्या वाढदिवसाला गेला. बर्थडे पार्टी उशिरापर्यंत चालणार होती. जादूचे खेळ वगैरे ठेवले होते. पण मित्राकडे लाईट गेली आणि पार्टी पटकन संपली. शेजार्यांकडून चावी घेऊन निनाद घरात येऊन बसला. टी.व्ही.वरचा सिनेमा बघता बघता त्याचा डोळा लागला.
कसल्यातरी खुडबुडीने त्याला जाग आली तर घरात अंधार व टॉर्च घेऊन कोणीतरी इकडे-तिकडे फिरतंय! तो जागा झाल्याचे पाहताच त्याच्या तोंडावर आडवा हात आवळला गेला. पाठीला काहीतरी टोकदार वस्तू टोचली व खरखरीत आवाजात त्याला उठायला सांगून आत नेलं गेलं. ‘‘कपाटाच्या चाव्या कुठं आहेत?’’ म्हणून विचारल्यावर निनाद पटकन उत्तरला, ‘‘कम्फर्ट-झोनमध्ये.’’ अंधारातला मनुष्य बुचकळ्यात पडला. तेवढ्यात दारावर टक्टक् झाली. ‘‘आई-बाबा आले, कडी उघडा…’’ निनाद म्हणाला. ‘‘कम्फर्ट-झोन कुठेय?’’- त्याला चिमटा काढत कोणतरी म्हणाला. मागचापुढचा विचार न करता निनादनं सरळ कुत्र्यांच्या व्हरांड्याकडे बोट दाखवलं. डुप्लीकेट चावीने बाहेरचे दार उघडून सर्वजण आत यायला व अंधारातल्या चोरांनी व्हरांड्यात शिरायला एकच गाठ पडली. ‘‘अरे, दिवे कोणी घालवले…’’ म्हणत बाबांनी मेन्सचं बटन चालू केलं आणि तिकडं व्हरांड्यात कुत्र्यांचं भुंकणं व आरोळ्यांनी घर दणाणून गेलं.
आधी सर्वजण घाबरून ऐकत राहिले व मग निनादनं ‘चोर…’ म्हणत खूण केल्यावर सर्वप्रकार बाबांच्या लक्षात आला. त्यांनी चोरांना बाहेर काढलं व आजोबांच्या मदतीने धरून ठेवलं. तोपर्यंत दादाचा पोलिसांना फोन गेलेलाच होता. खाली जीपचा सायरन वाजताच बाबा म्हणाले, ‘‘चल लेको, तुमच्या कम्फर्ट-झोनमध्ये.’’ आता बुचकळ्यात पडण्याची वेळ चोरांची होती व खदखदून हसण्याची निनादची!