विकासकामे व सामाजिक योजनांसाठी इंधन दरात वाढ ः वाहतूक मंत्री

0
88

सरकारला विकासकामे आणि सामाजिक योजनांवरील खर्चासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करावी लागली आहे, असा दावा वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.
कोविड महामारीच्या काळात पेट्रोल व डिझेल या इंधनाच्या दरात वाढ करणे योग्य नाही. तथापि, विकासकामे आणि सामाजिक योजनांना चालू ठेवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यासाठी इंधनाच्या दरात वाढ करावी लागली आहे. सध्याच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर इंधनाच्या दरात कपात केली जाऊ शकते, असा दावा मंत्री गुदिन्हो यांनी केला.

राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीनंतर नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मोटर वाहन कायद्याचे व्यवस्थित पालन व्हावे या उद्देशाने मोटर वाहन कायद्यात दंडाची रक्कम कायम ठेवण्यावर विचार विनिमय केला जात आहे. वाहन चालकांनी मोटर वाहन कायद्याचे पालन करावे. म्हणजे त्यांना दंडाला तोंड द्यावे लागणार नाही, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून गोवा मुक्तीदिनाची ६० वर्षे साजरी करण्यासाठी ३०० कोटी रुपयांची निधी उपलब्ध झाला आहे. त्यातील सुमारे १०० कोटी रुपये ऐतिहासिक स्थळाच्या देखभालीसाठी वापर केला जाणार आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीचा योग्य विनियोग केला जाणार आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
मंत्री गुदिन्हो यांच्या हस्ते राज्यात रस्ता अपघातात बळी पडलेल्या २४ जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या आर्थिक साहाय्याचे वितरण करण्यात आले. यावेळी वाहतूक संचालक व इतर अधिकारी उपस्थित होते.