वनहक्क दावे निकालात काढणार ः मुख्यमंत्री

0
191
????????????????????????????????????

>> मोले येथे पक्षी महोत्सवाचे उद्घाटन

आम्हाला मोले व गोव्याची जास्त चिंता आहे. मोलेतील ग्रामस्थ तसेच गोमंतकीय हे मोले वाचवण्यास समर्थ आहेत, असे सांगून काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वन हक्क कायद्यान्वये दावे निकाली काढण्याची प्रक्रिया त्वरित सोडवून वन अधिकारी आणि वनक्षेत्रात राहणार्‍यांमधील संघर्ष सोडवण्याचे आश्वासन दिले. काल मोले येथे तिसर्‍या पक्षी महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना सावंत यांनी सरकार पर्यटन खात्याच्यावतीने राज्यात ग्रामीण पर्यटनाला चालना देणार असल्याचेही स्पष्ट केले.

वनक्षेत्रात राहणारे ग्रामस्थ व वन अधिकारी यांच्यातील तंटा व संघर्ष आता संपायला हवा असे स्पष्ट करतानाच वन क्षेत्रात राहणार्‍या ग्रामस्थांनी वन हक्क कायद्याखाली जे दावे घातलेले आहेत ते हातावेगळे करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. वन हक्क कायद्यानुसार सुमारे १० हजार लोकांनी जमिनीसाठी दावे घातलेले आहेत असे सांगून वरील कायद्याखाली त्यांना त्यांची जमीन मिळायला हवी, असे सावंत यांनी यावेळी पुढे बोलताना स्पष्ट केले.

वरील १० हजार दाव्यांपैकी ३००० दाव्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता लवकरच भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार असून हे काम पूर्ण झाल्यानंतर दावे वेगाने हातावेगळे केले जाणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

गोव्यात १५० जातींची जी औषधी झाडे आहेत ती शोधून काढून त्यांची लागवड करण्यासाठी १८० युवकांना निसर्ग मार्गदर्शक तर अन्य ३५ जणांना वनमित्र म्हणून प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहितीही सावंत यांनी यावेळी दिली. आम्ही आज जैव-विविधता उद्यानाचे उद्घाटन तसेच मोले येथे पक्षी महोत्सवाचे आयोजन केले आहे, ज्यामुळे आपल्याला जैव-विविधता आणि जंगले किती आवडतात याचे हे एक स्पष्ट उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा हे एक पर्यटक राज्य आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटक गोव्यात येतात. आमची जैवविविधता उद्याने, धबधबे, वन्यजीव अभयारण्यांचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांनीही पाहावे अशी आमची इच्छा आहे. यासाठी आम्ही पर्यटन खाते आणि वनखाते यांच्यातील नाते दृढ केल्याने स्थानिकांना रोजगार व उत्पन्न मिळण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
बांधकाममंत्री दीपक पाऊसकर तसेच वनविभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी मोले येथे बायोडायव्हर्सीटी पार्कचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.