यजमान पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह त्यांनी दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. द. आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेले ८८ धावांचे लक्ष्य त्यांनी २२.५ षटकांत केवळ ३ गडी गमावून गाठले. हा सामना केवळ चार दिवसांत निकाली निघाला.
तिसर्या दिवसाच्या ४ बाद १८७ धावांवरून काल पुढे खेळताना पाहुण्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. नाईट वॉचमन केशव महाराज (२) याला आपल्या धावसंख्येत भर घालता आली नाही तर कर्णधार क्विंटन डी कॉक (२) याने निराश केल्याने आफ्रिकेचा पराभव निश्चित झाला. तेंबा बवुमा याने ४० धावांची खेळी केली. परंतु, संघाला शतकी आघाडी मिळवून देण्यास तो कमी पडला. द. आफ्रिकेचा दुसरा डाव १००.३ षटकांत २४५ धावांत संपला. पदार्पण केलेला डावखुरा फिरकीपटू नौमन अली याने केवळ ३५ धावांत ५ बळी घेत द. आफ्रिकेचे कंबरडे मोडले. यासिर शाहने ७९ धावांत ४ तर हसन अलीने १ गडी बाद केला. पहिल्या डावात पाहुण्यांना केवळ २२० धावा करणे शक्य झाले होते.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानने ३७८ धावा जमवल्या होत्या. विजयासाठी माफक लक्ष्य असताना पाकिस्तानचे सलामीवीर पुन्हा एकदा अपयशी ठरले. बाबर आझम सलग दुसर्या डावात महाराजचा बळी ठरला. पहिल्या डावात केवळ ७ धावा जमवलेल्या बाबरला अवघ्या ३० धावा करता आल्या. पहिल्या डावाप्रमाणेच दुसर्या डावातही तो पायचीत झाला. अझर अली ३१ व फवाद आलम ४ धावांवर नाबाद राहिला. मालिकेतील दुसरा सामना ४ फेब्रुवारीपासून रावळपिंडी येथे खेळविला जाणार आहे.