वूमन्स एशियन कपचा भारत यजमान

0
207

‘२०२२ एएफसी वूमन्स एशियन कप’ फुटबॉल स्पर्धा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत भारतात होणार असल्याचे एशियन फुटबॉल कॉन्फडरेशनने काल गुरुवारी जाहीर केले. स्पर्धेसाठी अहमदाबाद व नवी मुंबई येथील मैदाने यजमानपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. यापूर्वी १९८० साली भारताने या स्पर्धेचे यजमानपद भूषवले होेते. त्यावेळी कोझिकोड येथे सामने झाले होते. आगामी मोसमातील स्पर्धेत १२ देशांचा समावेश असेल. मागील मोसमात केवळ ८ देश होते. चार देशांचे प्रत्येकी ३ गट करण्यात येणार असून १८ दिवस चालणार्‍या या स्पर्धेत किमान २५ सामने होणार आहेत.

८ देश उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. २०२३ साली होणार्‍या फिफा वूमन्स वर्ल्डकपसाठीची पात्रता स्पर्धा म्हणूनही एशियन कपला महत्त्व प्राप्त झाले आहे. या पात्रता स्पर्धेद्वारे तब्बल ५ आशियाई देश ३२ देशांच्या वूमन्स वर्ल्डकपसाठी पात्र ठरणार आहेत. एशिया कपसाठीची पात्रता स्पर्धा या वर्षी १३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. मागील मोसमात पहिले तीन क्रमांक मिळविलेले जपान, ऑस्ट्रेलिया व चीन तसेच यजमान या नात्याने भारताने या स्पर्धेसाठी यापूर्वीच पात्रता मिळविली आहे. त्यामुळे उर्वरित ८ जागांसाठी पात्रता स्पर्धेत झुंज असेल.