शेतकरी आंदोलनातून दोन संघटनांची माघार

0
218

>> हिंसाचारप्रकरणी २६ नेत्यांवर गुन्हे दाखल, २०० जण ताब्यात

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांच्या सुरू असलेल्या आंदोलनातील दोन संघटनांनी माघार घेतली आहे.
राष्ट्रीय किसान मजदूर संघटना (व्ही. एम. सिंग) आणि भारतीय किसान युनियन (भानू) हे दोन गट आंदोलनातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आंदोलकांत फूट पडल्याचे मानले जाते. या दोन्ही गटांनी दिल्लीच्या चिल्ला सीमेवरील धरणे आंदोलन थांबवल्याची घोषणा केली आहे.

प्रजासत्ताक दिनाला दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची संपूर्ण जबाबदारी राकेश टिकैत यांनी घ्यावी. त्यांच्या आंदोलनाची दिशा आणि हेतू वेगळा आहे. दिल्लीत भारताचा राष्ट्रध्वजाचा अपमान झाला. त्याचा अनादर झाला. यामुळे आम्ही या आंदोलनातून माघार घेत आहोत असे व्ही. एम. सिंग यांनी काल सांगितले. यावेळी त्यांनी आंदोलनात सहभागी असणार्‍या इतर संघटनांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी हा निर्णय फक्त आपल्या राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचा असल्याचा खुलासाही केला आहे. आपल्या संघटनेतील सर्व पदाधिकार्‍यांनी व आपण घेतल्याचे यावेळी श्री. सिंग यांनी सांगितले.

भारतीय किसान युनियनमधील भानुप्रताप सिंह यांचा गटही शेतकरी आंदोलनातू बाहेर पडला आहे. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेने दुःख झाले असून लाल किल्ल्यावरील घटनेने चिंतेत आहे. यामुळे आम्ही धरणे आंदोलन थांबवत असल्याचे भानुप्रताप सिंह यांनी सांगितले.

२६ नेत्यांवर गुन्हे दाखल
मंगळवारी प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी २६ नेत्यांवर गुन्हे दाखल केले असून या प्रकरणी २०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिंसाचारप्रकरणात पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांविरुद्धही गुन्हे दाखल केले आहेत.
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मेधा पाटकर, योगेंद्र यादव, राकेश टिकैत, सर्वनसिंग पंढेर, सतनामसिंग पन्नू, दीप सिद्धू यांच्या नावाचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी जवळपास २०० जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

हरयाणात २००० जणांवर गुन्हे
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडसाठी निघालेल्या आंदोलक शेतकर्‍यांना हरयाणाच्या पलवाल येथे रोखल्यामुळे त्यांनी पोलिसांच्या बॅरिकेट्सची मोडतोड केली होती. याप्रकरणी २००० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यावेळी सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत गोदपुरी येथील सोफ्ता गावाजवळ पोलीस अधिकार्‍यांवर या लोकांनी हल्ला केला, बॅऱिकेट्स आणि कंटेनर्स तोडले.

संसदेवरील मोर्चा रद्द
शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मोर्चात झालेल्या हिंसेनंतर केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार्‍या विविध शेतकरी संघटनांनी येत्या १ फेब्रुवारीला संसदेवर काढण्यात येणारा पायी मोर्चा रद्द केल्याचे जाहीर केले आहे. स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी ही माहिती दिली.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळवण्यासाठी शहीद दिनाला आम्ही संपूर्ण देशभरात मोर्चे काढू. यासोबतच आम्ही एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही करू. मात्र संसदेवर १ फेब्रुवारीला निघणारा शेतकरी संघटनांचा पायी मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती किसान युनियनमधील राजेवाल गटाचे नेते बलबीर एस. राजेवाल यांनी दिली.