राज्यात चोवीस तासांत पुन्हा एकदा शंभरपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. नवीन ११२ कोरोना रुग्ण आढळून आले असून एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ५७० एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ८६२ एवढी झाली आहे. गेल्या १४ जानेवारीला १०३ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर चार दिवस नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी होती.
राज्यातील आणखीन ११५ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९५२ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९२ टक्के एवढे आहे.
कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ४८ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. नवीन ३४ कोरोना रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.
चोवीस तासांत २२५५ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ४.९६ टक्के नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. मागील काही दिवसात कमी प्रमाणात स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली.