>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही
राज्यातील पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांच्या प्रश्नांवर टॅक्सी व्यावसायिक आणि पर्यटकांचे हित डोळ्यासमोर ठेवून योग्य तोडगा लवकरच काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यातील पर्यटक टॅक्सी व्यावसायिक आणि ‘गोवा माईल्स’चे टॅक्सीचालक यांच्यात पर्यटकांच्या वाहतुकीवरून वरचेवर खटके उडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांची आल्तिनो – पणजी येथील सरकारी निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो, कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, वाहतूक खात्याचे अधिकारी आणि पर्यटक टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांची बाजू ऐकून घेण्यात आली असून टॅक्सी व्यावसायिकांच्या विविध मागण्यांवर योग्य तोडगा काढण्यात येणार आहे. गोमंतकीय, पर्यटक आणि टॅक्सी व्यावसायिकांच्या हितासाठी समतोल निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
एका बैठकीतून विविध मागण्यांवर तोडगा निघणे शक्य नाही. टॅक्सी व्यावसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यातील पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रथम त्या टॅक्सींना डिजिटल मीटर बसविणे आवश्यक आहे. मीटर बसविल्यानंतर सर्वांना प्रवाशांच्या वाहतुकीसाठी समान दर राहील. न्यायालयाने पर्यटक टॅक्सींना मीटर बसविण्याची सक्ती केली असून त्यांची लवकरच कार्यवाही केली जाईल, असे वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
‘गोवा माईल्स’ला पर्यटकांची वाहतूक करण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाने परवानगी दिलेली आहे, वाहतूक खात्याने नव्हे, तर, पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांना वाहतूक खात्याने परवानगी दिलेली आहे. पर्यटकांच्या वाहतुकीसाठी दोन खात्यांकडून टॅक्सींना परवानगीचा प्रश्न मंत्री लोबो यांनी उपस्थित करून दोन खात्यांकडून देण्यात आलेल्या परवानगीबाबत स्पष्टता करण्याची मागणी केली. स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी मंत्री लोबो यांनी केली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांच्या प्रश्नी आयोजित केलेल्या पहिल्या बैठकीतील चर्चा समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया टॅक्सी व्यावसायिकांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांच्या प्रतिनिधींनी ऍप आधारित ‘गोवा माईल्स’ बंद करण्याची मागणी बैठकीत केली.