मोटरवाहन कायद्याची राज्यातील अंमलबजावणी लांबणीवर ः गुदिन्हो

0
198

>> नितीन गडकरींशी आज चर्चा करणार

केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत मंगळवारी (१९ रोजी) होणार्‍या बैठकीनंतर राज्यात नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत नवीन मोटर वाहन कायद्याच्या मसुद्याला मान्यता घेऊन तो लागू करण्याची तयारी वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी चालविली होती.

तथापि, केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नवीन मोटरवाहन कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.१९) बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे राज्यात नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत नवीन मोटर वाहन कायद्याचा मसुदा मांडण्यात येणार नाही, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी देशात नवीन मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीला वाहतूकमंत्री गुदिन्हो सहभागी होणार आहेत. या बैठकीत घेण्यात येणार्‍या निर्णयानंतरच राज्यात नवीन मोटरवाहन कायदा लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी राज्यात नवीन मोटरवाहन कायदा लागू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत प्रस्ताव सादर केला होता. कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी राज्यातील रस्त्यांची स्थिती चांगली नसल्याने रस्त्यांची योग्य दुरुस्ती होईपर्यंत नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्यास विरोध केला होता. योग्य साधनसुविधा उपलब्ध केल्यानंतर नवीन मोटरवाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी मंत्री लोबो यांनी केली आहे.