कोरोना लसीकरणानंतर ४४७ जणांना बाधा

0
87

>> एकूण २.२४ लाख जणांना लस

कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या दिवशी सहा राज्यांत १७ हजार आरोग्य कर्मचार्‍यांना लस टोचण्यात आली. पहिल्या दिवशी शनिवारी लसीकरण सुरू केलेल्या दिवशी १ लाख ९१ हजार आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवसांत एकूण २ लाख २४ हजार ३०१ जणांना लस देण्यात आली आहे. यातील ४४७ जणांना साईड इफेक्ट दिसून आले असून त्यातील तिघांना इस्पितळात दाखल करावे लागले.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आठवड्यातून चार दिवस लसीकरण मोहीम सुरू ठेवावी असे निर्देश दिले आहेत. काल रविवारी सहा राज्यांत लसीकरण करण्यात आले तर शनिवारी ११ राज्यांत लसीकरण सुरू झाले होते. रविवारी झालेल्या लसीकरणात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मणिपूर व तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

कोरोना लस घेतलेले
५४ जण इस्पितळात

शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. जगातील ह्या सगळ्यात मोठ्या लसीकरणात पहिल्याच दिवशी सुमारे १ लाख ९२ हजार आरोग्य कर्मचार्‍यांनी लस टोचून घेतली. या लसीकरणाचे पहिल्या दिवशी कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नाहीत. मात्र काल रविवारी केवळ दिल्लीमध्ये ५१ जणांना साईट इफेक्ट झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये शनिवारी कोरोनावरील लस घेतल्यानंतर रविवारी तीन परिचरिकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. लस घेतल्यानंतर त्यांना थंडी, ताप, डोकेदुखी, थकवा, मळमळ, उलट्या, चक्कर येणे असे त्रास होऊ लागले. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.