शेतकर्‍यांच्या बदनामीसाठीच राजपथावर टॅ्रक्टर रॅलीची अफवा

0
195

>> आंदोलक शेतकरी संघटनांचा आरोप

प्रजासत्ताकदिनी शेतकरी संघटना राजधानी दिल्लीतील राजपथावर रणगाड्यांसोबत ट्रॅक्टर रॅली काढणार आहे. तसेच लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू देणार नाही ह्या बातम्या म्हणजे शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप किसान शेतकरी समितीने केला आहे.

गेले ५० दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. हे शतकरी प्रजासत्ताक दिनी राजपथावर टॅ्रक्टर रॅली काढणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याबाबत बोलताना समितीचे समन्वयक मंदीप नाथवान यांनी, काही लोक कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला हिंसक बनवण्यासाठी अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवत आहेत. ही लढाई केंद्र आणि शेतकरीविरोधी धोरणांविरोधात असून दिल्लीविरोधात नसल्याचे त्यांनी सांगितले. टॅ्रक्टर मोर्चा किंवा लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वजाबाबत कोणतेही विधान शेतकरी संघटनांनी केलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समितीवर नवे सदस्य नेमा
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त करण्यात आलेल्या समितीमधून उर्वरित तीन सदस्यांनाही काढून टाकावे आणि परस्पर सलोख्याच्या आधारे जे काम करतील अशा सदस्यांची समितीमध्ये निवड करावी, अशी विनंती एका शेतकरी संघटनेने सर्वोच्च न्यायालयास केली आहे.
शेतकरी संघटनांचे नेते आणि केंद्र सरकार यांच्यात १९ जानेवारी रोजी चर्चेची दहावी फेरी पार पडणार आहे. यावेळी कायदा रद्द करण्याऐवजी काय हवे आहे ते त्यांनी सांगावे असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे. शेतकरी संघटना केवळ कायदे रद्द करा हीच मागणी करत आहेत. कायदे रद्द याऐवजी इतर पर्याय सांगावेत असे आवाहन तोमर यांनी शेतकर्‍यांना केले आहे.

कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन
केंद्राने लागू केलेले कृषी कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचे शेतकरी नेते सांगत आहेत. सरकारला आणखी चर्चा करायची असेल तर आमचीही तयारी आहे. मात्र, आम्हाला सरकारकडून फारशा अपेक्षा नसल्याचे या नेत्यांनी सांगितले. आतापर्यंत शेतकरी संघटना व केंद्र सरकारमध्ये चर्चेच्या ९ फेर्‍या पार पडल्या आहेत. मात्र अद्यापही या प्रकरणी तोडगा निघालेला नाही.