सौराष्ट्रकडून गोवा पराभूत

0
212

>> सय्यद मुश्ताक अली क्रिकेट
>> बारोतचे शतक; उनाडकट-चिरागचा भेदक मारा

अवी बारोतच्या दमदार शतकाच्या जोरावर सौराष्ट्राने गोव्याला ९० धावांनी पराभूत करीत सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत काल शानदार विजय नोंदविला. गोव्याचा हा दुसरा पराभव ठरला. गोव्याला पहिल्या सामन्यात पराभव मध्यप्रदेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसर्‍या लढतीत गोव्याने सेनादलला पराभूत केले होते.

२१६ धावांच्या धावांचा पाठलाग करताना गोव्याचा डाव १८.४ षटकांत १२५ धावांवर संपुष्टात आला. गोव्याची फलंदाजी आज एकदम सुमार झाली. त्यांच्या एकनाथ केरकर (३२), कर्णधार अमित वर्मा (२३), आदित्य कौशिक (२२), स्नेहल कौठणकर १६ व दीपराज गावकर (१४) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. अन्य फलंदाज अपयशी ठरले. सौराष्ट्रकडून जयदेव उनाडकट व चिराग जानी यांनी प्रत्येकी ३, चेतन साकारियाने २ गडी बाद केला.
तत्पूर्वी अवी बारोतने गोव्याच्या गोलंदाजांची धुलाई करताना केवळ ५३ चेंडूंत ११ चौकार व ७ उत्तुंग षट्‌कारांचा पाऊस पाडत १२२ धावांची शतकी खेळी केली व सौराष्ट्राला ५ बाद २१५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. अशोक डिंडाने हार्विक देसाईला (६) बाद करीत गोव्याला प्रारंभीच यश मिळवून दिले. परंतु त्यानंतर अवीने फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेत समर्थ व्यास (४१) समवेत १११ धावांची भागीदारी केली. त्यानंतर प्रेरक मंकड (२०) समवेत त्याने महत्त्वपूर्ण ४९ धावा जोडल्या. पार्थ चौहानने १३ धावांचे योगदान दिले. गोव्याकडून अशोक डिंडाने २ तर लक्षय गर्गने १ गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक ः सौराष्ट्र, २० षटकांत ५ बाद २१५ (अवी बारोत १२२, समर्थ व्यास ४१, प्रेरक मंकड २०, पार्थ चौहान १३, चिराग जानी नाबाद ९ धावा. अशोक डिंडा २-३२, लक्षय गर्ग १-४२ बळी) विजयी वि. गोवा, १८.४ षटकांत सर्वबाद १२५, ( वैभव गोवेकर ०, आदित्य कौशिक २२, लक्षय गर्ग ३, स्नेहल कवठणकर १६, अमित वर्मा २३, सुयश प्रभुदेसाई १, एकनाथ केरकर ३२, दर्शन मिसाळ ३, दीपराज गावकर १४, मलिकसाब सिरुर नाबाद ६, अशोक डिंडा १ धावा. जयदेव उनाडकट ३-२८, चिराज जानी ३-२४, चेतन साकारिया २-१५, धर्मेंद्रसिंग जडेजा १-२८, प्रेरक मंकड १-३० बळी).