लाबुशेनचे शतक; ऑस्ट्रेलिया भक्कम

0
239

मार्नस लाबुशेन याने दोन जीवदानांचा लाभ उठवत ठोकलेल्या पाचव्या कसोटी शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ५ बाद २७४ अशी मजबूत स्थिती गाठली आहे. भारताकडून नटराजन याने सर्वाधिक २ गडी बाद केले तर सुंदर, सिराज व शार्दुलने प्रत्येकी एक बळी टिपला.
डावातील पहिल्याच षटकात सिराजने वॉर्नरला तंबूची वाट दाखवत भारताला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. दुसरा सलामीवीर मार्कुस हॅरिस ठाकूरच्या पहिल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. खराब चेंडूवर खराब फटका खेळत त्याने लेग साईडला सुंदरकडे झेल दिला. स्टीव स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी यानंतर तिसर्‍या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी रचली. सुंदरने स्मिथला बाद करत ही जोडी फोडली. सैनीने टाकलेल्या पुढच्याच षटकात ‘गली’मध्ये रहाणेने लाबुशेनचा सोपा झेल सोडला. यावेळी लाबुशेन ३७ धावांवर खेळत होता.

हा झेल पकडला असता तर ऑस्ट्रेलियाचा संघ ४ बाद ९३ असा चाचपडत असता. यानंतर वैयक्तिक ४८ धावांवर असताना नटराजनच्या गोलंदाजीवर चेतेश्‍वर पुजाराने पहिल्या स्लिपमध्ये लाबुशेनला जीवदान दिले. स्मिथ बाद झाल्यानंतर लाबुशेन व मॅथ्यू वेड यांनी चौथ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. वेडचा आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अंगलट आला. नटराजनने त्याला बाद केले. नटराजनने यानंतर शतकवीर लाबुशेनला पुलच्या प्रयत्नात माघारी धाडत कांगारूंची पाच बाद २१३ अशी स्थिती केली. दिवसअखेर टिम पेन व कॅमेरून ग्रीन यांनी ६१ धावांची अविभक्त भागीदारी केली आहे. दिवसातील शेवटच्या अर्ध्या तासाचा खेळ सुरू असताना शार्दुल ठाकूर याने मैदान सोडले होते. नवदीप सैनीदेखील दुखापतीमुळे केवळ ७.५ षटके गोलंदाजी करू शकला आहे.

भारताला या सामन्यासाठी संघात चार बदल करावे लागले. हनुमा विहारीची जागा मयंक अगरवाल याने घेतली तर रवींद्र जडेजाच्या जागेवर शार्दुल ठाकूरला संघात घेण्यात आले. हे दोन बदल अपेक्षित होते. परंतु, प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्‍विन व प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह तंदुरुस्त न ठरल्याने भारताला मोठा धक्का बसला. चायनामन कुलदीप यादव संघात असताना टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट व दौर्‍यावर नेट गोलंदाज असलेल्या वॉशिंग्टन सुंदर याला अश्‍विनच्या जागी स्थान देण्यात आले. बुमराहची जागा नटराजन याने घेतली. सुंदर व नटराजन यांनी या सामन्याद्वारे कसोटी पदार्पण केले.

धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः डेव्हिड वॉर्नर झे. रोहित गो. सिराज १, मार्कुस हॅरिस झे. सुंदर गो. ठाकूर ५, मार्नस लाबुशेन झे. पंत गो. नटराजन १०८, स्टीव स्मिथ झे. रोहित गो. सुंदर ३६, मॅथ्यू वेड झे. ठाकूर गो. नटराजन ४५, कॅमेरून ग्रीन नाबाद २८, टिम पेन नाबाद ३८, अवांतर १३, एकूण ८७ षटकांत ५ बाद २७४
गोलंदाजी ः मोहम्मद सिराज १९-८-५१-१, थंगरसू नटराजन २०-२-६३-२, शार्दुल ठाकूर १८-५-६७-१, नवदीप सैनी ७.५-२-२१-०, वॉशिंग्टन सुंदर २२-४-६३-१, रोहित शर्मा ०.१-०-१-०