अहंकाराचा वारा न लागो …

0
461
  • ज.अ. रेडकर.
    (सांताक्रूझ)

गैर व भ्रष्ट मार्गाने मिळवलेली संपत्ती तर कधीच सुख आणि समाधान देऊ शकत नाही. सत्ता आज आहे, उद्या नाही म्हणजे तीदेखील बेभरवशाची! आणि शारीरिक सौंदर्य तर खूपच अल्पायुषी! शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडले की बुद्धीचा काय उपयोग? मग अशा या सर्व गोष्टींचा अहंकार तरी माणसाने का बाळगावा?

सनातन हिंदू धर्मात ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि सन्यासाश्रम असे चार आश्रम सांगितले आहेत तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही मनुष्याची चार उद्दिष्टे सांगितली आहेत. शुद्ध आचार- विचार- उच्चार आणि सहृदयता अंगीकारून जीवन व्यतीत केल्यास मनुष्य जीवन सुफळ व संपन्न होते. मात्र मनुष्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्‌रिपू जडतात आणि सगळा विचका होतो. यासोबत अहंकार, अहंगंड, दुराभिमान, दंभ, अरेरावी, क्रौर्य हे आणखी सहा उपरिपू म्हणता येतील, ते जडतात. सत्ता, संपत्ती, बुद्धी आणि सौंदर्य यातून अहंकार निर्माण होतो. सत्ता आणि संपत्ती यातून दंभ, अरेरावी आणि क्रौर्य निर्माण होऊ शकते. बुद्धी भ्रष्ट झाली तर छल-कपट हा रोग जडतो. दुसर्‍याचे अहित करण्यासाठी अशा दुष्ट बुद्धीचा वापर केला जातो. अहंकाराच्या तोर्‍यात आपण हे विसरून जातो की कधीतरी सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य या तिन्ही गोष्टी आपणापासून दुरावणार आहेत. लक्ष्मी ही चंचल असते. तिचा गर्व केला, अपव्यय किंवा गैरवापर केला तर ती रुसते आणि आपल्यापासून दूर जाते. गैर व भ्रष्ट मार्गाने मिळवलेली संपत्ती तर कधीच सुख आणि समाधान देऊ शकत नाही. सत्ता आज आहे उद्या नाही म्हणजे ती देखील बेभरवशाची! आणि शारीरिक सौंदर्य तर खूपच अल्पायुषी! शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडले की बुद्धीचा काय उपयोग? मग अशा या सर्व गोष्टींचा अहंकार तरी माणसाने का बाळगावा? परंतु हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि शेवटी माणसाला पश्चात्ताप करून घ्यावा लागतो. ऋषिकेश देशमाने याचेदेखील असेच झाले. कोण होते हे देशमाने?
एका आटपाट नगराचे ऋषिकेश देशमाने हे पटवारी होते. गरीब भोळे-भाबडे शेतकरी त्याला इज्जत देण्यासाठी दिवाणसाहेब म्हणायचे. नगराचा शेतसारा, भूमापन, दंड वसुली ही कामे याच्याकडे होती. आपल्या अधिकाराचा अहंकार या गृहस्थाला अतीच होता. आपण करू ती पूर्व दिशा असे त्याला वाटायचे. त्याच्या कारभाराने लोक त्रस्त होते. बरे, त्याच्या वरिष्ठाकडं तक्रार करायची म्हटले तर तेदेखील एक नंबरचे भ्रष्ट व पाजी आणि या पटवारीला सामील! सगळ्यांचीच मिली भगत! मग करणार तरी काय! लहान-मोठे शेतकरी आणि जमीनमालक या पटवारीला व त्याच्या कारभाराला विटले होते पण त्याच्या विरुद्ध काही करू शकत नव्हते. कारण तक्रार केली तर त्याचा वचपा काढून हा आपली जमीन गिळंकृत करील किंवा जमिनीचा सात बारा बिघडवून टाकील ही भीती होती. कारण अशी बारीकशी चूक जमिनीच्या सात बार्‍यात पटवारीने केली तर ती निस्तरणे पुढे फार फार कठीण होऊन बसते हे शेतकर्‍यांना माहीत होते. हीच कळीची नस पकडून या पटवारीची मनमानी चालली होती. आपल्या अधिकाराचा गैरवापर करून देशमानेने भरपूर माया गोळा केली. शेजारच्या गावात मोठी बागायती काय, फार्म-हाऊस काय, कारगाडी काय, बायका पोरांच्या अंगावर दागदागिने काय! सगळी चंगळच! पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याची माती होतेच! आणखी कुणी नाही तरी नियती अपराध्याला शिक्षा करीत असते. नियतीची लाठी ना दिसते ना ती आवाज करते, पण वेळ आली की ती बरसते. शिशुपालाचे देखील शंभर अपराध भरावे लागले होते आणि नंतरच त्याचा वध झाला. देशामानेच्या बाबतीतदेखील असेच झाले.

देशामानेला दोन मुले. एक मुलगा एक मुलगी. आपल्या दोन्ही मुलांना त्याने उत्तम शिक्षण दिले. मुलगा इंजिनिअर तर मुलगी डॉक्टर झाली! इंजिनिअर मुलगा नोकरीनिमित्त लंडनला गेला तर मुलीचे लग्न होऊन ती सासरी गेलेली. सगळी भौतिक सुखे त्याच्या पायाशी आता लोळण घेत होती. देशामानेला वाटले, चला आपण जिंकलो. आपले जीवन सफल झाले. या यशाने तो आणखीनच अहंकारी बनला. आपल्यासारखा सुखी कुणी नाही असा भ्रम त्याला झाला. ज्याच्या- त्याच्यापुढे तोरा मिरवू लागला. दुसर्‍यांना तुच्छ लेखू लागला. हाताखालच्या माणसांचा आणि गरीब शेतकर्‍यांचा पाणउतारा करू लागला. दिवसेंदिवस त्याची गुर्मी वाढतच गेली.

सदाभाऊ हा त्या नगरातील एक अल्पभूधारक शेतकरी. सतत तीन वर्षे अवर्षणामुळे त्याच्या शेतात काहीच पिकले नाही. सावकाराच्या कर्जातही तो बुडून गेलेला. अशा वेळी त्याच्याकडून शेतसारा भरायचा राहून गेला. उत्पन्न नाही मग शेतसारा भरणार तरी कुठून? देशामानेला हे सर्व माहीत असून देखील त्याने सदाभाऊच्या मागे शेतसारा भरण्याचा तगादा लावला. सदाभाऊ गयावया करीत होता पण देशमाने काही ऐकायला तयार नाही. म्हणाला, शेतसारा भरणे शक्य नाही तर तुझी शेतजमीन वीक, जनावरं वीक आणि आठ दिवसाच्या आंत शेतसारा भर! कोणत्याही शेतकर्‍याला आपली जमीन आणि आपली गुरं-ढोरं जीव की प्राण असतात. जमीन असली तर त्याची गुजराण होणार असते आणि गोठ्यातली गुरंढोरं तर त्याला आपली लेकरं वाटत असतात. सदाभाऊ मोठ्याच संकटात अडकले.

एक दिवस देशमाने आपल्या लव्याजम्यासह सदाभाऊच्या दारात हजर, म्हणाला, ‘शेतसारा भर नाहीतर तुझी बैलं घेऊन जातो.’ सदाभाऊ गयावया करू लागला हातापाया पडू लागला पण देशमाने ऐकायला तयार नाही आणि त्याने गोठ्यात दावणीला बांधलेल्या बैलांच्या दोरीला हात घातला. अनोळखी माणसाला पाहून जनावरं बुजतात. बैलानं हिसडा मारून गळ्यातली दोरी तोडली आणि देशामानेच्या पोटात आपली अणकुचीदार शिंगे खुपसली आणि दिला त्याला दूर फेकून! पुन्हा धावत जाऊन बैलाने त्याला तुडवला असता परंतु सदाभाऊने बैलाला आवरले म्हणून थोडक्यात निभावले. कुणी सांगावे त्या मुक्या जनावराला देखील वाटले असेल की, कोण हा टिक्कोजीराव, माझ्या धन्याला धमकावतो आहे आणि म्हणून त्याने पटवारीच्या पोटात शिंगे खुपसली असतील. कारण धनी जसा आपल्या जनावरांवर प्रेम करतो तशी ही मुकी जनावरेदेखील आपल्या धन्यावर प्रेम करीत असतात. परस्परांना एकमेकांच्या भावना व भाषा कळत असतात.

देशामानेच्या बरोबर आलेल्या इतर माणसांनी रक्तबंबाळ झालेल्या देशामानेला उचलले आणि थेट इस्पितळात दाखल केले. देशामानेच्या पोटातील आतडी तुटली होती. बरेच रक्त वाहून गेले होते. जोराने आपटल्यामुळे दोन चार फासळ्या मोडल्या होत्या. दगडावर डोकं आपटल्याने मेंदूला देखील मार बसला होता. देशमानेची शुद्ध हरपली होती. स्थानिक इस्पितळात उपचार होणारे नव्हते. त्याला दुसर्‍या शहरातील मोठ्या इस्पितळात दाखल करावे लागले. या अपघाताची बातमी कळताच देशामानेची दोन्ही मुले गावी आली.

तब्बल सहा महिने देशमानेला इस्पितळात काढावे लागले. डॉक्टरांनी आतडी शिवली, बरगड्यांची हाडे देखील जोडली परंतु देशामानेच्या मेंदूला जबर मार लागल्याने तो कोमात गेला होता. बर्‍याच उपचारांनंतर चार महिन्यांनी तो कोमातून बाहेर आला. परंतु त्याची एक बाजू लुळी पडली होती आणि त्याच बरोबर त्याची वाचाही गेली होती. नियतीने देशामानेला त्याच्या केल्या कर्माची जबर शिक्षा दिली होती. या परिस्थितीत देशामानेची नोकरीही संपुष्टात आली. ना हुद्दा राहिला ना अधिकार! आता कुणावर मुजोरी करणार होता? इस्पितळातील उपच्रारासाठी झालेल्या अवाढव्य खर्चापायी त्याला आपले फार्म-हाऊस, गाडी, बागायती विकावी लागली. तो पूर्ण कफल्लक झाला. लंडनमध्ये संपूर्ण लॉकडाऊन झाल्याने मुलाचीही परदेशातील नोकरी गेली. मुलगी आपल्या सासरी निघून गेली. देशमाने असहाय, निर्धन, विकलांग झाला. नियतीने त्याच्या अहंकाराची, अरेरावीची, उद्दामपणाची कठोर शिक्षा त्याला दिली होती. म्हणूनच तुकाराम महाराज सांगून गेले, ‘अहंकाराचा वारा न लागो माझ्या मना!’