विश्‍वशांतीचे प्रतिनिधी ः स्वामी विवेकानंद

0
264
  • डॉ. लता स. नाईक

‘‘माय डियर ब्रदर्स अँड सिस्टर्स’’ म्हणून त्यांनी सर्व श्रोतृवृंदाला संबोधले व सभागृहात अजरामर असा टाळ्यांचा गडगडाट झाला. सर्व विश्‍वालाच बंधुत्वाचं नातं बहाल करणारा हा तेजस्वी, ओजस्वी भारतीय संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद! कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका, प्रचंड सामर्थ्य तुमच्या एकट्याकडे आहे. उठा, जागृत व्हा व ध्येय गाठेपर्यंत कार्यरत रहा… असा मोलाचा संदेश त्यांनी युवकांना दिला.

क्या हार में क्या जीत में
किंचित नही भयभीत मैं
कर्तव्यपथपर जो भी मिला
यह भी सही, वह भी सही
वरदान नही मांगूंगा….
हो कुछ, पर हार नही मानूंगा…’’

कै. अटलबिहारी वाजपेयीजींच्या या ओळी वाचताना युगप्रवर्तक, युगप्रणेता स्वामी विवेकानंदांची मूर्ती नजरेसमोर उभी राहते. आधुनिक युगाचे महामानव, महासंत म्हणजेच विवेकानंद असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्यासारखे संतमानव आपले ध्येय, आपले कार्य एकदाच ठरवून टाकतात व ते लक्ष्य गाठेपर्यंत पुढे जात राहतात, मग त्यांच्या त्या वाटचालीच्या मार्गावर कितीही अडथळे आले तरीही त्याची पर्वा ते करत नाहीत.
शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेनंतर भारतात आलेल्या स्वामी विवेकानंदांना संपूर्ण विश्‍वात वेगळी ओळख मिळालीच होती पण भारतातील प्रत्येक नागरिकासाठी स्वामीजी देवतूल्य बनले होते. खरे तर या सभेत बोलताना विवेकानंदांनी ‘हिंदूंच्या धार्मिक कल्पना’ हा विषय सुविशाल श्रोतृसमुदायास पटवून देण्यासाठी उलगडला होता. पण या विश्‍वविख्यात विषयाची समाप्ती जेव्हा त्यांनी केली तेव्हा एक वेगळाच धर्म, नव-हिंदू धर्म निर्माण झाला होता. आणि या नवीन धर्माला समजून घेत होता तो पाश्‍चिमात्त्य- आधुनिक म्हणवला जाणारा समाज!
खरे तर आधुनिक काळातील हा शांतीदूत सदोदित विश्‍वशांतीचेच स्वप्न पाहात होता आणि अशाच प्रकारचे, विश्‍वशांतीचा संदेश देणारे पसायदान हजारो वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्‍वरांनी माऊली बनून आपल्या लेकरांच्या हृदयात कोरले होते. यातून एक गोष्ट अजून जाणवते ती म्हणजे भारतवर्षाने आपल्या पुण्य मातीत प्राचीन युगातच नव्हे तर कलियुगातही ज्या संतांना जन्म दिला ते सगळेच विश्‍वशांतीचे भोक्ते होते. कुणीही भांडण-तंटा, वादविवाद यासारख्या गोष्टींमधून कधीच रस घेतला नाही.

जवळजवळ दोन वर्षे त्यांनी भारतभ्रमण केले आणि देशाच्या अगदी टोकाशी असलेल्या कन्याकुमारी येथील श्रीपाद शिलेवर बसून केलेल्या ध्यानानंतर आपल्या भारतीय बंधूंच्या सर्व कष्टांच्या निवारणासाठी शिकागोतील सर्वधर्मसभेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कारण आपल्या भारत भ्रमण यात्रेत त्यांनी पाहिलेली देशाची विकलांग स्थिती, इथले दारिद्य्र, निरक्षरता, गरीबी, अंधश्रद्धा, ब्रिटिश राजसत्तेचा दबाव या सगळ्याखाली असहाय्य अशी भारतातली जनता भरडली जात असल्याचे पाहून त्यांचे मन व्यथीत झाले होते.
ही १८९३ मधली गोष्ट. खेत्रीच्या महाराजांनी विवेकानंदांसाठी बोटीचे तिकिट काढून दिले. कारण त्यांना सर्वधर्मसभेत भारताचे प्रतिनिधीत्व करायचे होते. अमेरिकेत भरणार्‍या या सभेसाठी रवाना होताना या महापुरुषाजवळ पुंजी होती ती फक्त स्वतःवरील विश्‍वासाची. भारतभ्रमण यात्रेच्या वेळी ते जिथे जिथे तरुणांना संबोधन करीत तेव्ह तेव्हा सांगत असत की भले तुम्ही तेहत्तीस कोटी देवांवर विश्‍वास ठेवा, पण स्वतःवर जर विश्‍वास नसेल तर यातील कुठलाच देव तुमच्या मदतीला येणार नाही. असे सांगणारे स्वामीजी फक्त स्वतःवरील विश्‍वासामुळे अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात असत.

सर्वधर्मसभा अमेरिकेतील शिकागो येथे भरणार आहे एवढीच मोघम माहिती त्यांना होती. ह्या धर्मसभेत प्रवेश घेण्यासाठी कसले नियम पाळावे लागतील, कधी जावे लागेल, कोणती ओळखपत्रं न्यावी लागतील याची काहीही माहिती नव्हती. फक्त एकच त्यांना माहीत होतं- मी या धर्मसभेत जाणार.
कोणत्याही कार्यासाठी साहसी वृत्ती असणे गरजेचे असते. साहसी व्यक्तीच आपले कार्य मन लावून करते व त्या कार्यात यशही संपादन करते. आजचा युवा वर्ग हा तसा खूपच तल्लख बुद्धीचा आहे, हुशार आहे. त्यांच्या बाहूंमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. काळाच्या प्रवाहाला रोखण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. गरज फक्त एकाच गोष्टीची असते ती म्हणजे योग्य दिशा दाखवणारा ध्रुव तारा हवा असतो. स्वामीजींच्या आयुष्यात आलेले अनेक प्रसंग अशी उत्साहाने भरलेली प्रेरणा तर देतातच पण ध्रुव तारा बनून दिशादर्शकही ठरतात.

भारताची भ्रमणयात्रा आयुष्याचा एक भला मोठा ग्रंथ बनला स्वामीजींसाठी; या अनुभवाच्या ग्रंथाने ग्रंथालयातील ग्रंथांपेक्षा जास्त शिकवले स्वामीजींना!
केवढा आत्मविश्‍वास वाटत होता स्वतःबद्दल त्यांना! भारत जननीच नव्हे तर संपूर्ण विश्‍वातच एक क्रांती घडवण्याचे बळ आपल्याला लाभले आहे याची खात्री होती त्यांना. त्यांचा जन्म मकर संक्रांतीचा! या दिवशी जन्मलेले विवेकानंद संघ क्रांती घडवणारेच होते. भगिनी ख्रिस्तीन या त्यांच्या विदेशी शिष्या. त्यांना वाटायचे की स्वामी विवेकानंद हे एक अत्यंत तेजस्वी पुरुष असून ते एका परमोच्च जगतातून येथे पृथ्वीतलावर अवतरले होते.
स्वामीजींच्या या दृढ निश्‍चयाचा आपल्या युवा मनावर काय परिणाम अपेक्षित आहे? काय करू शकतो आपण? काहीतरी वेगळे ज्यात फक्त आपलेच कल्याण नसून इतरांचेही भले होईल? एक छोटेसे पाऊल का असेना, पण ते उमेदीचे, निष्ठेचे, सत्याचे, प्रामाणिक असे पाऊल असावे!
दैवदेखील त्यांचीच मदत करते, जो स्वतःची मदत स्वतःच करतो. खरं आहे हे. जीवनाच्या समरसंघर्षात असेही प्रसंग येतात की त्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण आपली धर्मनौका जर या जीवनप्रवाहात योग्य दिशेने न डगमगता निघाली तर यशाच्या किनार्‍यावरच तिचे स्वागत होते.

३१ मे १८८३ या दिवशी मुंबईहून शिकागोसाठी स्वामीजी रवाना झाले. या प्रवासात अनेक देशांचे दर्शन त्यांनी घेतले; करता करता ते शिकागो येथे जुलै महिन्यात पोहोचलेदेखील. जवळजवळ १२ दिवस त्यांनी शिकागो शहराचे दर्शन घेतले. इथल्या अप्रतिम आश्‍चर्यकारक इमारतींचे, तिथल्या झगमगाटाचे दर्शन ते घेत होते. खिशातील पैसे हळूहळू संपत आले होते. त्यांनी सर्वधर्मसभेबद्दल चौकशी केली असता त्यांना समजले की ही सभा सप्टेंबर महिन्यात होणार आहे व सभेत सहभागी होण्यासाठीची प्रवेशाची तारीखदेखील निघून गेली होती! तसेच या सभेत प्रतिनिधी म्हणून भाग घेण्यासाठी कोणत्यातरी धार्मिक संघटनेचे ओळखपत्र गरजेचे होते. स्वामीजींनी लगेच तारेने भारतातील मद्रास येथील एक धार्मिक संघटनेकडे ओळखपत्र व इतर मदत मागितली, तेव्हा त्या संघटनेच्या प्रमुखांनी उत्तर पाठवले, ‘‘लेट द डेव्हिल डाय ऑफ कोल्ड’’.
असं म्हणतात की जीवनात एखादे वेळी एखाद्याची वेळ जेव्हा पालटते… तेव्हा ती वेळ सर्वकाही पालटून टाकते. विवेकानंदांनी ती तार वाचली आणि ‘‘द डेव्हिल नायदर डाइड नॉर गेव्ह अप!’’ त्यांनी स्वतःला दैवाच्या हवाली केलं आणि याच दैवानं पुन्हा एकदा या दैवी माणसाला सावरलं.

आपल्या खिशातले शेवटचे डॉलर खर्चून ते शिकागोहून बॉस्टनला आले. या थोर पुरुषाची छवीच अशी होती की जिथे हा पुरुष अवतरेल तिथे अनेकांच्या नजरा त्याच्या तेजस्वी रूपावर खिळून राहात. हा कुणीतरी असामान्य पुरुष.. असे त्याच्याकडे बघणार्‍या प्रत्येकाला वाटत असे. बॉस्टनला जात असताना ट्रेनमध्ये एका महिलेशी त्यांची ओळख झाली व या महिलेने हॉर्वर्ड विश्‍वविद्यालयाचे प्रोफेसर जे. एच. राईट यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. स्वामीजींशी बोलल्यानंतर राईट यांनी स्वामीजींना म्हटले की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत भारतातील हिंदुत्व हा विषय जगासमोर मांडलाच पाहिजे आणि असं सांगून त्यांनी सर्वधर्मसभेच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षांना विवेकानंदांना हा विषय मांडण्याची अनुमती द्यावी, असे पत्र लिहिले आणि अशा प्रकारे या सर्वधर्मसभेसाठी ते निवडले गेले.

शिकागोतील सर्वधर्मसभेसाठी अगदी अध्यक्षांच्या परवानगीने स्वामीजी बोस्टनहून पुन्हा शिकागोकडे निघाले. स्टेशनवर जेव्हा स्वामीजी पोचले तेव्हा त्यांच्याजवळ एकही दमडी नव्हती. त्यामुळे त्या रात्री त्यांनी स्टेशनवरील एका रिकाम्या बॉक्समध्ये झोपून ती रात्र काढली. दुसर्‍या दिवशी हा संन्यासी मग दारोदार मदत मागण्यासाठी फिरू लागला. तो भगवा वेश व त्यांची तेजस्वी मूर्ती. तरीदेखील त्यांचा दारादारात अपमान झाला. कुणी शिविगाळ केली तर कुण्या घरातील नोकराने त्यांच्या तोंडावर धाडकन् दरवाजा मारला तर कुणी अपमानही केले. तरीसुद्धा हा महापुरुष अपमानाचे कडू घोट पचवत होता. खूप थकल्या भागल्या स्वामींनी एका ठिकाणी बसकण् मारली. ते हरले नव्हते पण त्या दिवशी थकले होते उपाशीपोटी दारोदार फिरून. आपल्या देशबांधवांसाठी काहीही पचवण्याची त्यांची तयारी होती. आपल्या भूमीतल्या या माणसांसाठी तो काहीही करीत असे. असा हा तेजःपुंज, पुरुषार्थाने भरलेला संन्यासी कधीही खचला नाही.

या तेजस्वी युवकाला असे भर रस्त्यात थकलेल्या चेहर्‍याने बसलेला पाहून डार्स हेल नावाच्या स्त्रीने त्यांची मदत सर्वधर्मसभेच्या त्या प्रशस्त वास्तुमध्ये जाण्यासाठी केली आणि विवेकानंदांचे स्वागत तिथे इतर प्रतिनिधींबरोबर अगदी उत्साहाने झाले. ‘द ओरिएन्टल डेलिगेट’ म्हणून त्यांना स्वीकारण्यात आले.
‘‘माय डियर ब्रदर्स अँड सिस्टर्स’’ म्हणून त्यांनी सर्व श्रोतृवृंदाला संबोधले व सभागृहात अजरामर असा टाळ्यांचा गडगडाट झाला. कारण सर्व विश्‍वालाच बंधुत्वाचं नातं बहाल करणारा हा तेजस्वी, ओजस्वी भारतीय संन्यासी! त्याने दोनच शब्द उच्चारले व सर्वांच्या हृदयात तो कायमचा विराजमान झाला. त्यानंतर अनेक दिवस त्यांना अनेक विषयांवरील व्याख्याने देण्याचा बहुमान मिळाला. खरेतर जाहीर करण्यात येत असे की स्वामी विवेकानंद बोलणार आहेत तेव्हा प्रेक्षकांची अफाट गर्दी व्हायची. स्वामीजींचा धर्मसभेपर्यंत पोचण्याचा प्रवासच किती प्रेरणादायक आहे!! या सभेनंतर त्यांची एक वेगळी ओळख संपूर्ण देशाला झाली. कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका, प्रचंड सामर्थ्य तुमच्या एकट्याकडे आहे. उठा, जागृत व्हा व ध्येय गाठेपर्यंत कार्यरत रहा… असा मोलाचा संदेश त्यांनी युवकांना दिला.