आयआयटी विरोधकांना वाढता पाठिंबा

0
204

>> पाल, नानेली व हिवरेवासीयांनी काढली रॅली

मेळावली आयआयटी विरोधात सत्तरीतील गावांचा पाठिंबा वाढत आहे. काल गुरूवारी पाल, नानेली व हिवरे गावातील लोकांनी मेळावलीवासीयांना पाठिंबा देण्यासाठी चालत रॅली काढली. यामध्ये पाचशेजण सहभागी झाले होते. यापूर्वी सालेली, शिरसोडे, कुडशे, शीर, करमळी, करंजोळ, कुमठोळ, खडकी, तार, होंडा, पर्ये, कुभांरखंड, वेळगे, सावर्डे व बाराजण येथील गावातील लोकांनी आयआयटीविरोधात मेळावलीवासीयांना पाठिंबा दिला आहे. या सर्वांनी मेळावलीतील आयआयटी इतरत्र ठिकाणी नेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आयआयटी आंदोलन तीव्र होताना दिसत आहे.

आयआयटी विरोधी आंदोलनात अनेकजण सहभागी होताना दिसत होते. आयआयटी विरोधात सत्तरी एकवटली असून मेळावलीतील लोकांना पाठिंबा वाढत आहे. सत्तरीतील बहुतांश गावातील तरुण मेळावलीवासीयांच्या समर्थनार्थ रस्यांवर उतरत आहेत. तसेच मेळावलीत जाऊन त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या मेळावलीवासीयांना आपला पाठिंबा देत आहेत.

मेळावलीत आंदोलन सुरूच
मेळावलीतील आंदोलक अजूनही आपल्या मागणीवर ठाम असून मेळावलीत कोणत्याही स्थितीत आयआयटी होऊ देणार नाही असा त्यांनी निश्चय केला आहे. काल गुरूवारीही मेळावलीवासीयांनी जंगलात आंदोलन सुरू ठेवले होते.

रविवारी तिरंगा पदयात्रा
आयआयटी विरोधकांना पाठिबा देण्यासाठी रविवारी चलो मेळावलीची हाक देऊन उसगाव ते मेळावली अशी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १७ रोजी सकाळी नऊ वाजता उसगाव वडाकडे येथून ही पदयात्रा सुरू होईल. तिरंगा सत्याग्रह कुठल्याही पक्षाचा नसून मेळावलीवासीयांना पाठिंबा देण्यासाठी ही पदयात्रा आयोजित केली आहे. यात मेळावलीवासीयांना पाठिंबा देण्यासाठी कोणीही सहभागी होऊ शकतो असे आयोजकांनी कळवले आहे.

आरोग्यमंत्र्यांनी
राजीनामा द्यावा

मेळावलीत जे काही घडले त्याला सर्वस्वी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे जवाबदार असून आरोग्यमंत्र्यांनी मंत्रिपदाचा व आमदारकीचा राजीनामा द्यावा व मगच बोलावे अशी मागणी वाळपई कॉंग्रेसने पत्रकार परिषदेद्वारे काल केली. वाळपई कॉंग्रेसचे अध्यक्ष दशरथ मांद्रेकर म्हणाले की, आयआयटी प्रकल्प आमदाराने मेळावलीत आणला. आयआयटीला विरोध केला म्हणून आपल्याच खात्यातील कामगारांच्या बदल्या केल्या. विकलांग लता गावकर यांची बदली केली. मेळावलीतील आयआयटी विरोधकांवर अत्याचार केले आणि आता सत्तरीतील जनता आयआयटीला विरोध करीत आहे. त्यामुळे आपणास २०२२ ची निवडणूक जड जाईल म्हणून सर्व नाटक करीत आहेत. त्यामुळे अशा आमदारावर विश्‍वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी केले.

आयआयटी प्रकल्पाचे
कुडचड्यात स्वागत ः काब्राल

राज्य सरकार शेळ मेळावली येथील नियोजित आयआयटी संकुलाचे दुसरीकडे स्थलांतर करीत असल्यास कुडचडे मतदारसंघात आयआयटी संकुलाचे स्वागत करण्याची तयारी आहे. काही लोकांच्या समस्या असतील, त्यावर योग्य तोडगा काढला जाईल, असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.